पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई
15 नोव्हेंबर 2019 पर्यंत, म्हणजेच पुढील आठ महिने पृथ्वी शॉला क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. अगोदरच दुखापतीने त्रस्त असलेल्या पृथ्वी शॉवर मोठं संकट ओढावलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) डोपिंग प्रकरणी दोषी आढळला आहे. यानंतर बीसीसीआयकडून पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत, म्हणजेच पुढील आठ महिने पृथ्वी शॉला क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. अगोदरच दुखापतीने त्रस्त असलेल्या पृथ्वी शॉवर मोठं संकट ओढावलं आहे.
कफ सिरपमध्ये आढळणारा प्रतिबंधित घटक पृथ्वी शॉने घेतला होता. ज्यामुळे तो अँटी-डोपिंग चाचणीत दोषी आढळला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये पृथ्वी शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. Terbutaline नावाच्या औषधाचं पृथ्वी शॉने सेवन केल्याचं निष्पन्न झालंय. हा पदार्थ ‘वाडा’ने (World Anti-Doping Agency) बंदी घातलेल्या यादीमध्ये आहे.
डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वी शॉने 16 जुलै रोजी स्पष्टीकरण दिलं होतं. कफ सिरपसाठी हे औषध घेतल्याचं त्याने सांगितलं आणि बीसीसीआयने हे स्पष्टीकरण मान्य केलं आहे. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या काळात पृथ्वी शॉवर ही बंदी लागू असेल.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय संघात पृथ्वी शॉचा समावेश नसल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण तो दुखापतीमुळे बाहेर असल्याचं नंतर सांगण्यात आलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याची निवड झाली होती. पण दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यालाही त्याला मुकावं लागलंय.
बीसीसीआयने डोपिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी विदर्भाचा अक्षय दुलारवर आणि राजस्थानच्या दिव्य गजराजचंही निलंबन केलंय.