एकाच वेळी दोन्ही मुलांची भारतीय संघात निवड, वडिलांकडून धोनीचे आभार
दीपक चहर (Deepak Chahar) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या दोघांचीही भारतीय संघात निवड झाली आहे. टी-20 मालिकेसाठी निवड झाल्यानंतर राहुल चहरने (Rahul Chahar) त्याच्या यशाचं श्रेय टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला दिल्याचं राहुलच्या वडिलांनी सांगितलं.
नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20, वन डे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. महेंद्रसिंह धोनीचं संघात नसणं आणि चहर ब्रदर्सची निवड हे या संघाच्या निवडीचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. दीपक चहर (Deepak Chahar) आणि राहुल चहर (Rahul Chahar) या दोघांचीही भारतीय संघात निवड झाली आहे. टी-20 मालिकेसाठी निवड झाल्यानंतर राहुल चहरने (Rahul Chahar) त्याच्या यशाचं श्रेय टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) दिल्याचं राहुलच्या वडिलांनी सांगितलं. ते एका वेबसाईटशी बोलत होते.
दोन्ही भावांची एकाचवेळी संघात निवड झाल्यामुळे चहर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. राहुल चहरचे वडील देशराज चहर यांनी मुलांच्या खेळाबद्दल आनंद व्यक्त केलाय. राहुलला 2017 पासूनच धोनीने प्रचंड मदत केली, असं म्हणत त्यांनी धोनीचे आभार मानले. दोन्ही मुलं एकाचवेळी देशासाठी खेळण्यासाठी निवडण्यात आले यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, असं ते म्हणाले. राहुल रायझिंग पुणे सुपरजाएंट्सकडून खेळत होता तेव्हापासूनच धोनीने त्याला नेहमी मार्गदर्शन केलं, असंही देशराज म्हणाले.
धोनी सरांनी पुण्याकडून खेळत असतानापासून खुप मदत केली, असं मला राहुलने सांगितलं. धोनी यापुढेही माझ्या मुलाच्या मदतीसाठी नेहमी तयार असेल, अशी अपेक्षाही देशराज यांनी व्यक्त केली. राहुल चहर यापूर्वी आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्त्वातील रायझिंग पुणे सुपरजाएंट्सकडून खेळत होता. तर यावेळी त्याने मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. तर राहुलचा भाऊ दीपक चहर (Deepak chahar) धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधित्व करतो.
भारतीय संघ (टी-20 मालिका)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
भारतीय संघ (वन-डे मालिका)
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी
भारतीय संघ (कसोटी मालिका)
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव