द्रविडचं ठरलेलं लग्न 2002 मध्ये अडकलं! राहुल आणि विजेताच्या लव्हस्टोरीत नेमकं काय घडलं? वाचा
Rahul Dravid And Vijeta Lovestory: बंगळुरूच्या राहुल द्रविडचं नागपूरकर विजेताशी कसं लग्न ठरलं? प्रपोज कोणी केला हे वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..
मुंबई: भारतीय संघाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची प्रेमकहाणीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. मैदानावर संयमी आणि द वॉल अशी उपमा मिळालेल्या राहुल द्रविडची खऱ्या आयुष्यात कोणी आणि कशी विकेट काढली? नागपूरकर विजेताच्या प्रेमात राहुल द्रविड कसा पडला असा प्रश्नही चाहत्यांना पडतो.राहुल द्रविडची लव्हस्टोरी खूपच इंट्रेस्टिंग आहे. क्रिकेट राहुल द्रविडने डॉक्टर विजेता पेंढारकरसोबत 4 मे 2003 साली लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं असून त्यांची नावं समित आणि अन्वय अशी आहेत. पण बंगळुरूच्या राहुलची नागपूरच्या विजेताशी नेमकी ओळख झाली तरी कशी असा प्रश्न पडला असेल ना? चला जाणून घेऊयात या दोघांनी लव्हस्टोरी..
असं केलं राहुल द्रविडनं प्रपोज
विजेता पेंढारकर या डॉक्टर असून त्यांचे वडील इंडियन एअरफोर्समध्ये विंग कमांडर होते. त्यामुळे विजेताला वडिलांच्या पोस्टिंगनुसार शहरं बदलावी लागत होती. वडिलांची पोस्टिगं 1968 ते 1971 पर्यंत बंगळुरु येथे झाली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाचा संपर्क राहुल द्रविडच्या कुटुंबाशी आला. कौटुंबिक संवादामुळे विजेता आणि राहुल यांची ओळख झाली आणि दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले. पण वडिलांच्या निवृत्तीनंतर संपूर्ण कुटुंब नागपूरला शिफ्ट झालं आणि प्रेमाचा रंग आणखी गडद झाला. विजेता नागपूरला शिफ्ट झाल्यानंतर राहुल भेटण्यासाठी तिथे यायचा. त्यानंतर दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले. त्यानंतर एक दिवस राहुलने विजेताला लग्नाबाबत विचारलं आणि तिने होकार दिला.
घरच्यांनी या दोघांच्या लग्नाला होकार आणि 2002 साली लग्न करण्याचं ठरलं. मात्र राहुल द्रविड 2003 वर्ल्डकपसाठी तयारी करत होता. यामुळे दोन्ही कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. वर्ल्डकपनंतर 2003 साली बंगळुरुत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी आणि मुलांकडे लक्ष देण्याचं ठरवलं.
राहुल द्रविडची क्रिकेट कारकिर्द
राहुल द्रविडनं आपल्या फलंदाजीनं क्रीडारसिकांची कायम मनं जिंकली आहेत. द्रविडचं विकेट काढणं भल्याभल्यांना जमलं नाही. राहुल द्रविडने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 164 कसोटी, 344 वनडे, 1 टी 20 आणि 89 आयपीएल सामने खेळले आहेत. राहुल द्रविडने कसोटीत 36 शतकं, 5 द्विशतकं आणि 63 अर्धशतकं ठोकली आहेत. वनडे कारकिर्दित 12 शतकं आणि 83 अर्धशतकं केली आहेत. तर आयपीएलमध्ये 11 अर्धशतकं नावावर आहेत. राहुल द्रविड आपल्या कारकिर्दित एकमेव टी 20 सामना खेळला. राहुल द्रविडने या सामन्यात 3 षटकांच्या जोरावर 31 धावा केल्या. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.