Rahul Dravid : वर्ल्डकप ट्रॉफी उंचावताच द्रविडची जोशात गर्जना, ‘मिस्टर कूल’चा हा अवतार कधीच पाहिला नसेल, Video व्हायरल

| Updated on: Jun 30, 2024 | 1:10 PM

2024 च्या टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाने मैदानावर जल्लोष साजरा केला. मात्र टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हातात जेव्हा ही ट्रॉफी आली तेव्हा त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचे विजयाचे सेलिब्रेशन भन्नाट होते, त्याचा आनंद पाहून भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही जल्लोष करत मैदान डोक्यावर घेतले.

Rahul Dravid : वर्ल्डकप ट्रॉफी उंचावताच द्रविडची जोशात गर्जना, मिस्टर कूलचा हा अवतार कधीच पाहिला नसेल,  Video व्हायरल
Image Credit source: social media
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना, शनिवारी पार पडला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 7 पराभूत करत इतिहास रचला आणि वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघान प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ केला आणि फायनलमध्येही त्यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली. मात्र अंतिम सामन्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा ही मॅच आपल्या हातातून निसटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग जमा होऊ लागले. पण त्यानंतर पंड्या, बुमराह आणि अर्शदीप या त्रिकुटाने आणि भारतीय संघातील क्षेत्ररक्षकांच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाने सामन्यात शानदार पुनरागमन केले, ज्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद केली जाईल. अखेर भारताने द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला आणि प्रशिक्षक रहिल द्रविडसह कोट्यवधि भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मैदानात एकच जल्लोष झाला.

T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनलमधील शानदार विजयानंतर राहुल द्रविडलाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने भन्नाट जल्लोष करत हा विजय साजरा केला. वर्ल्डकपची ट्रॉफी विराट कोहलीने राहुल द्रविडच्या हातात दिल्यानंतर ‘मिस्टर कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रविडने अक्षरश:गर्जना करत सेलीब्रेशन केले. तेव्हाचा त्याचा आवेश पाहून इतर खेळाडूही अवाक् झाले. द्रविडच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला.

 

द्रविडचा व्हिडीओ व्हायरल

फायनल मॅचच्या शेवटच्या शटकातील अखेरचा चेंडू संपताच पॅव्हेलियनमध्ये उभ्या असलेल्या द्रविडने येस, अखेरच जिंकलोच अशा अविर्भावात विजय साजरा केला. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते. विजय मिळवल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी मेडल स्वीकारले आणि त्यानंतर जय शाह यांच्या हस्ते कॅप्टन रोहितने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. त्यावेळी सर्वच खेळाडूंच्या जल्लोषाने स्टेडियम दणाणून गेले. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्या सर्वांनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बोलावले आणि कोहलीने द्रविड यांच्या हातात ट्रॉफी दिली. वर्ल्डकपची ट्रॉफी हातात येताच राहुल द्रविडने मोठ्याने ओरडत जे सेलिब्रेशन केलं की ते पाहून सर्वच कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूही अवाक् झाले. त्यांनीही उत्साहात आपल्या सरांना साथ दिली. राहुल द्रविडने अक्षरश: सिंहगर्जना करत या विजयाचे सेलिब्रेशन केले. नेहमी शांत, संयमी असलेल्या राहिल द्रविडचा हा नवा अवतार पाहून सगळेच स्तिमित झाले.त्याचा हा अवतार सर्वांसाठीच नवा होता. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून राहुल द्रविड कधीच विश्वचषक जिंकू शकला नाही, पण आता त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडिया विश्वचषक विजेती ठरली.

 

माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत

भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर द्रविड भावूक झाला. ” मला या संघाचा किती अभिमान वाटतो, ते सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहीत. सुरुवातीच्या षटकात 3 विकेट गमावल्यावर देखील आम्ही चांगला खेळ केला. शेवटी 30 चेंडू उरलेले असताना जी परिस्थिती होती, त्यातूनही संघातील खेळाडूंनी मार्ग काढत उत्तम खेळ केला आणि विश्वास कायम ठेवला. हा माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण आहे’ अशा शब्दांत राहुल द्रविड याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

 

“खेळाडू म्हणून मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही. पण मी माझं सर्वोत्तम काम केलं. या संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम करता आलं हे माझं भाग्य आहे. या मुलांना ही ट्रॉफी जिंकता आली, हा एक उत्तम अनुभव आहेत. हा एक चांगला प्रवास होता..” असं द्रविड म्हणाला. टी-20 विश्वचषक 2024 हा अंतिम सामना राहुल द्रविड याच्यासाठी भारताचे प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना होता