ब्रिस्बेन : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारुन, कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर (Team India) शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवखे खेळाडू, अनुभवाची कमी, स्लेजिंगचा भडिमार या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा हा विजय अत्यंत महत्वाचा आहे. टीम इंडियाचे जखमी खेळाडू योद्ध्याप्रमाणे लढले. दुखापतींमुळे अनेक खेळाडू मायदेशी परतले. जे उरले ते यापूर्वी एखाद-दुसरी कसोटी खेळले होते. काहींची तर ही पहिलीच कसोटी मालिका होती. त्यामुळे भारतीय संघाच्या या विजयाची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांनी झाली आहे. (Ravi Shastri Dressing room speech after India beat Australia)
भारताच्या या विजयानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले. जखमी योद्ध्यांच्या धाडस, संकल्प आणि धैर्य पाहून भारावून गेलेल्या या खडूस प्रशिक्षकाने टीम इंडियाच्या खेळाडूंना शाबासकी दिली. बघता बघता ड्रेसिंग रुम टाळ्या आणि शिट्ट्यांच्या आवाजाने दणाणून गेला.
दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी 328 धावांचं कठीण लक्ष्य गाठलं. आजपर्यंत अजिंक्य समजला जाणारा ऑस्ट्रेलियाच्या ‘गाबा’ मैदानाचा किल्ला, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने सर केला. तब्बल 32 वर्षांनी गाबाच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा बुरुज ढासळला. या विजयानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये केवळ तीन मिनिटांचं भाषण दिलं.
भारावलेले रवी शास्त्री म्हणाले, “जे धाडस, जे धैर्य तुम्ही दाखवलं, ते अवर्णनीय आहे. जखमा झेलल्या, संघ केवळ 36 धावांत ऑलआऊट झाला. अशी बिकट स्थिती असूनही तुम्ही मागे वळून पाहिले नाहीत. स्वत:वर विश्वास दाखवला, त्याचंच हे फळ आहे. हा आत्मविश्वास रातोरात आला नाही. या आत्मविश्वासाने संघ नव्याने उभा राहिला. तुमचा खेळ तुम्ही दाखवला. त्यामुळे आज केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग तुम्हाला सॅल्युट करतंय”
रवी शास्त्री ज्यावेळी बोलत होते, त्यावेळी विजयीवीर कर्णधार अजिंक्य रहाणे गपचूप त्यांच्या बाजूला उभा होता.
“आज तुम्ही जो पराक्रम गाजवला आहे, तो नेहमी लक्षात ठेवा. या क्षणाचा आनंद लुटा. हा क्षण तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका”, असा सल्ला रवी शास्त्रींनी दिला. यावेळी रवी शास्त्रींनी बाऊन्सर झेलणाऱ्या चेतेश्वर पुजारा, मॅचविनर रिषभ पंत, युवा सलामीवीर शुभमन गिल यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
शास्त्री म्हणाले, “या विजयाची सुरुवात मेलबर्नपासून झाली. सिडनीमध्ये चांगली कामगिरी केली. जेव्हा ऑस्ट्रेलियाशी बरोबर झाली, त्यानंतर आपण ब्रिस्बेनपर्यंत पोहोचलो. शुभमनने जबरदस्त कामगिरी केली. पुजी (पुजारा) तुला परमयोद्धा म्हणून ओळखलं जाईल”
शास्त्री बोलत होते तेव्हा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज शिटी वाजवण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
पुढे रवी शास्त्री म्हणाले, “रिषभला तर तोड नाही. तू ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यावेळी काही क्षण अनेकांना हृदविकाराचे धक्के दिले. तुझ्यावर जी जबाबदारी होती ती तू भक्कमपणे निभावलीस”
हे सर्व घडत असताना, अजिंक्य रहाणे शांतचित्ताने उभा होता. टीममधील खेळाडूंचं कौतुक करुन झाल्यानंतर कोच रवी शास्त्रींनी मग आपला मोर्चा अजिंक्य रहाणेकडे वळवला. रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्व कौशल्याचं तोंडभरुन कौतुक केलं.
आपण ज्या दयनीय स्थितीत होतो, त्या स्थितीत जिंक्सने (रहाणे) नेतृत्त्व हाती घेतलं. कठीण काळात रहाणेने टीम इंडियाला तुफानी कमबॅक करुन दिलं. मैदानात त्याने घेतलेले निर्णय लाजवाब होते, असं रवी शास्त्रींनी नमूद केलं.
रवी शास्त्रींनी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर या युवा गोलंदाजांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली. या मॅचमध्ये तीन नवे खेळाडू ज्यांनी पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली, त्यांना विसरुन चालणार नाही. नट्टू, वाशी आणि शार्दूल यांनी उत्तम खेळ केला, असं शास्त्री म्हणाले.
(Ravi Shastri Dressing room speech after India beat Australia)
VIDEO
WATCH – Exclusive: Head Coach @RaviShastriOfc delivers a dressing room speech at Gabba.
A special series win in Australia calls for a special speech from the Head Coach. Do not miss!
Full ?️?️https://t.co/kSk2mbp309 #TeamIndia pic.twitter.com/Ga5AaMvkim
— BCCI (@BCCI) January 19, 2021