रवी शास्त्रींनी ‘नंबर 4’चा प्रश्न अखेर सोडवला!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहून तो चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करेल, असा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटतो
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यवस्थापनाची मोठी डोकेदुखी दूर केल्याचं दिसत आहे. टीम इंडियात चौथ्या नंबरवर कोणाला खेळवायचं, हा मोठ्या कालावधीपासून सतावणारा प्रश्न रवी शास्त्रींनी अखेर सोडवला. वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) रुपाने रवी शास्त्रींना चांगला पर्याय दिसत असल्याची माहिती आहे.
नुकतंच विंडीजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरला पाचारण करण्यात आलं होतं. संतुलित फलंदाजी करुन श्रेयसने दोन सामन्यांमध्ये 71 आणि 65 धावांची खेळी केली. त्यामुळे तो भविष्यात संघासाठी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास शास्त्रींना वाटतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयसला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला जात आहे.
भारताचे युवा क्रिकेटपटू चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असल्याचं शास्त्रींना वाटतं. ‘श्रेयस अय्यर नंबर 4 वर टिकणार आहे. आणखीही काही युवा क्रिकेटपटूंना संधी मिळेल’ असं रवी शास्त्रींनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.
बॅटिंग ऑर्डरमध्ये नंबर 4 हा टीम इंडियासाठी कळीचा मुद्दा आहे. अंबाती रायुडूला फॉर्म न गवसल्याने विश्वचषकाच्या आधीच संघातून वगळण्यात आलं होतं. विश्वचषकादरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि केदार जाधव यांचे पर्याय होते. भारताने विजय शंकरऐवजी ऋषभ पंतला संधी दिली होती. मात्र ऋषभ पंत भरवशाच्या म्हशीला टोणगा निघाला. पंतकडून चाहत्यांसह संघाचीही निराशा झाली.
दमदार श्रेयस अय्यर
24 वर्षीय मुंबईकर श्रेयस अय्यरने याआधी आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी बजावली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद त्याने भूषवलं होतं. दुसरीकडे, नुकत्याच विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यात श्रेयसने दोन अर्धशतकी खेळी केल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार कोहलीसोबत अनुक्रमे 125 आणि 120 धावांची भागीदारी रचत त्याने भारताला मालिका 2-0 ने जिंकून देण्यास मदत केली. ड्रेसिंग रुम नर्व्हस असताना कठीण परिस्थितीत चांगलं परफॉर्म करायला आपल्याला आवडतं, असं श्रेयस म्हणतो.
रवी शास्त्री पुन्हा रिंगमास्तर
क्रिकेट सल्लागार समिती (CAC) ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. रवी शास्त्री हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचे असल्याने त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. रवी शास्त्रींनी 2014 ते 2016 या दरम्यान भारतीय संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच 2015 च्या विश्वचषकाची संपूर्ण जबाबदारीही रवी शास्त्री यांनी पेलली होती.
शास्त्रींच्या हाती तिसऱ्यांदा छडी
रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला आहे. यासोबतच रवी शास्त्रींनी एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यात विजय मिळवला आहे.