टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. माजी कर्णधार कपिल देव हे सीएसीचे प्रमुख आहे. या समितीत कपिल देव यांच्या व्यतिरिक्त माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. या त्रिसदस्यी समितीने रवी शास्त्री यांची निवड केली आहे.
टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अंतिम सहा नावं शार्टलिस्ट करण्यात आली होती. या सहा जणांना शुक्रवारी मुंबईतील बीसीसीआयच्या हेडक्वॉटरमध्ये बोलवण्यात आले होते. त्यावेळी या सर्व उमेदवारांचे प्रेझेंटेशन आणि मुलाखती या समितीच्या समोर पार पडल्या. त्यानंतर सीएसी समितीने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.
Kapil Dev, Cricket Advisory Committee (CAC): Ravi Shastri to continue as Indian Cricket Team’s (Senior Men) Head Coach pic.twitter.com/3ubXMz4hn3
— ANI (@ANI) August 16, 2019
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019
रवी शास्त्री हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचे असल्याने त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना कपिल देव म्हणाले की, “प्रशिक्षकपदाच्या अंतिम मुलाखतीनंतर रवी शास्त्री यांना सर्वात जास्त गुण मिळाले आहेत. तसेच या निवड प्रक्रियेपूर्वी विराट कोहलीशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. रवी शास्त्री यांनी प्रेझेंटेशनमध्ये गेल्या दोन वर्षात त्यांनी टीमसाठी काय केले याबद्दल सांगितले. तसेच येत्या काळात ते टीममध्ये कोणत्या सुधारणा करणार आहेत याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले.”
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यासह प्रमुख प्रशिक्षकाच्या शर्यतीत टीम इंडियाचे माजी मॅनेजर लालचंद राजपूत (Lalchand Rajput), माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंह (Robin Singh), ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी (Tom Moody), न्यूजीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson), अफगानिस्तानचे माजी प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) हे ही होते.
वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत रवी शास्रींचा कार्यकाळ
टीम इंडियाच्या प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला होता. सद्यस्थितीत प्रशिक्षकपदाचा करार हा विश्वचषकापर्यंतचा होता. मात्र, त्यानंतर प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला होता. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार होते.
तीन वेळा प्रशिक्षक पदी कार्यरत
रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला आहे. यासोबतच रवी शास्त्रींनी एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यात विजय मिळवला आहे. रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे.
विशेष म्हणजे 2011 ते 2015 या काळात टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर असतानाही ते टीम इंडियासोबत कायम जोडलेले असायचे. रवी शास्त्रींनी 2014 ते 2016 या दरम्यान भारतीय संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच 2015 च्या विश्वचषकाची संपूर्ण जबाबदारीही रवी शास्त्री यांनी पेलली होती.
शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात अनेकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे रवी शास्त्री यांच्या काळात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा कसोटी सामन्यात पराभव केला होता.