बडबड बंद करा, तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलोय, जाडेजाचं मांजरेकरांना उत्तर
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विटरवर झालेल्या खडाजंगीत जाडेजाने संजय मांजरेकरांना आरसा दाखवला.
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विटरवर झालेल्या खडाजंगीत जाडेजाने संजय मांजरेकरांना आरसा दाखवला. “मी तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे, अजूनही खेळतो आहे. खेळाडूंनी जे मिळवलंय त्याचा सन्मान करणं शिका”, असं रोखठोक उत्तर जाडेजाने मांजरेकरांना दिलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
संजय मांजरेकर यांनी भारतीय संघातील जाडेजाच्या समावेशाबाबत भाष्य केलं होतं. भारताचा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर जाडेजाला संघात घेण्याची चर्चा सुरु होती. त्याबाबत मांजरेकर म्हणाले, “अर्धी बॅटिंग आणि अर्धी बोलिंग करणारा खेळाडू नको. वन डेमध्ये जाडेजा अर्धी बॅटिंग आणि अर्धी बोलरची भूमिका निभावतो. कसोटीत तो बोलर म्हणूनच खेळतो. मात्र वन डे सामन्यात स्पेशालिस्ट बॅट्समन किंवा बोलर हवा, जो जाडेजा नाही”
जाडेजाचं उत्तर
संजय मांजरेकर यांच्या या टीपणीनंतर रवींद्र जाडेजा चांगलाच संतापला. जाडेजाने ट्विटरवर मांजरेकरांना टॅग करुन भडास काढली. जाडेजा म्हणाला, “तुम्ही जेवढे सामने खेळलेत, त्यापेक्षा दुप्पट सामने मी खेळलो आहे. अजूनही मी खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवलंय, त्यांचा सन्मान करायला शिका. तुमच्या बडबडीबद्दल मी बरंच ऐकलं आहे”
Still i have played twice the number of matches you have played and i m still playing. Learn to respect ppl who have achieved.i have heard enough of your verbal diarrhoea.@sanjaymanjrekar
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 3, 2019
विश्वचषकात जाडेजाला अद्याप संधी नाही
विश्वचषकात भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी एकाही सामन्यात जाडेजाला संधी मिळालेली नाही. पण जाडेजाने राखीव खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करताना जबरदस्त कामगिरी केली आहे.
जाडेजा आणि संजय मांजरेकर यांची कारकीर्द
- अष्टपैलू रवींद्र जाडेजाने 151 वन डे सामन्यात 2035 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 174 विकेट्स घेतल्या आहेत.
- दुसरीकडे संजय मांजरेकर यांनी 74 वन डे सामन्यात 1994 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर केवळ 1 विकेट आहे.
- जाडेजा 41 कसोटी सामन्यात 1485 धावा आणि 192 विकेट्स घेतल्या आहेत.
- तर संजय मांजरेकर यांनी 37 कसोटी सामने खेळले असून शून्य विकेट त्यांच्या नावावर आहे.
- संजय मांजरेकर यांनी 1987 मध्ये कसोटी पदार्पण केलं, तर ते शेवटची कसोटी 1996 मध्ये खेळले. तर रवींद्र जाडेजा अद्याप भारताकडून खेळत आहे.