Special Report : सिकंदर की महेंद्र, जिंकलं कोण?; कुस्तीचा डाव संपला, मात्र आता दाव्यांची दंगल!
बाहेरील टांग डावावर दोन फोटोही फिरतायत. एक फोटो म्हणजे पाठिमागच्या बाजूचा. दुसऱ्या फोटो म्हणजे समोरच्या बाजूचा. या दोन्ही फोटोवरुन कुस्ती शौकीनांमध्ये दोन मतं आहेत.
पुणे : कुस्तीचा डाव संपलाय. मात्र आता दाव्यांची दंगल सुरु झालीय. पैलवान जसा डावावर प्रतिडाव टाकतो, तसं महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखचे समर्थक दाव्यांचे दावे-प्रतिदावे सांगतायत. सिकंदरवर अन्याय झाला म्हणून एकानं थेट पंचानाच धमकीचा फोनही केलाय. महाराष्ट्र केसरीची कुस्ती संपलीय. मात्र वाद संपलेला नाही. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्याऐवजी उपांत्य सामन्याचा वाद गाजतोय. खरा महाराष्ट्र केसरी सोलापूरचा सिकंदर शेखच होता. मात्र पंचानी चुकीच्या पद्धतीनं महेंद्र गायकवाडला चार गुण बहाल केल्याचा आरोप होतोय.
आरोपांची लढाईत सिंकदरला विजेते मानणारे आता थेट सामन्याच्या पंचाला फोन करु लागले आहेत. व्हिडीओत पैलवान महेंद्र गायकवाडनं सिंकदरविरोधात जो डाव टाकलाय. त्याला कुस्तीच्या आखाड्यात ”बाहेरील टांग डाव” म्हटलं जातं. डाव टाकला तो महेंद्र गायकवाडनं आणि बचावात्मक पावित्र्यात होतो तो म्हणजे सिकंदर शेख.
डेंझर पोझिशन कोणती
असं म्हणतात की हा डाव टाकल्यानंतर समोरच्या पैलवान डेंजर पोझिनमध्ये जातो. आणि जर डाव यशस्वी पडला तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण दिले जातात. पण याच बाहेरील टांग डावावरुन वाद-प्रतिवाद आहेत. काहींच्या मते जर या डावात बचावात्मक पैलवान म्हणजे सिकंदर शेखच्या खांद्याची रेषा मातीशी 90 अंशापेक्षा कमीच्या कोनमध्ये असेल, तेव्हा डेंझर पोझिशन मानलं जातं.
रेफ्री पाठीमागच्या साईडने
बाहेरील टांग डावावर दोन फोटोही फिरतायत. एक फोटो म्हणजे पाठिमागच्या बाजूचा. दुसऱ्या फोटो म्हणजे समोरच्या बाजूचा. या दोन्ही फोटोवरुन कुस्ती शौकीनांमध्ये दोन मतं आहेत. स्वतः सिकंदर शेखनं याबाबत म्हटलंय की जेव्हा हा डाव पडला. तेव्हा रेफ्री पाठीमागच्या साईडनं होते.
सिकंदरला विजेते मानणारे याच व्हिडीओवरुन कुस्तीच्या पंचाशी भांडत आहेत. सिकंदर शेखच्या घरची परिस्थिती बेताची आहे. मुलावर अन्याय झाल्याच्या भावनेनं त्याचं कुटुंबही व्यथित झालंय.
सिकंदरच्या वडिलांनी केली हमाली
सिकंदरचे आजोबाही पैलवान होते. त्याच्या वडिलांनीही कुस्ती खेळली. पण परिस्थितीमुळे कुस्ती सोडून सिकंदरच्या वडिलांनी हमाली केली. मात्र पोराला पैलवान बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. सिकंदरनं असंख्य कुस्ती खेळल्या आहेत. मोठ-मोठ्या पैलवानांना धूळ चारलीय.
आतापर्यंत कुस्तीच्या स्पर्धा जिंकत सिंकदरनं ४० चांदीच्या गदा, 24 बुलेट, 6 टीव्हीएस कंपन्यांच्या बाईक, 6 हिरो-होंडाच्या स्प्लेंडर गाड्या, महिंद्रा थार, जॉन डिअर कंपनीचं ट्रॅक्टर, चार अल्टो कार सिकंदरनं कुस्तीच्या मैदानातून जिंकल्यायत.
दरम्यान मातीतली कुस्ती संपून सोशल मीडियात पंचाच्या निर्णयावरुन समर्थक-विरोधकांची दंगल सुरु झालीय. मात्र तूर्तास मैदानात जे झालं ते सर्वांना बघितलं. असं म्हणत सिकंदर शेखनं नव्या तयारीची सुरुवात करण्याचं बोलून दाखवलंय.