रोहित शर्माचा पुन्हा फ्लॉप शो, निता अंबानी आणि हिटमॅन यांच्यात सामन्यानंतर नेमकं काय झालं? Video व्हायरल
आयपीएल स्पर्धेवर कॉर्पोरेट कल्चरचा खऱ्या अर्थाने दबदबा आहे. खेळाडूंवर कोट्यवधि रुपये ओतल्यावर त्यांच्याकडून तशाच पद्धतीची अपेक्षा केली जाते. अनेकदा फ्रेंचायझी मालकाच्या कपाळावर सामन्यादरम्यान आठ्या पडलेल्या पाहायला मिळतात. मागच्या पर्वात केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मालकांच्या हावभावावरून बरंच काही क्रीडाप्रेमी ठरवतात.

आयपीएल 2025 स्पर्धेत सलग दोन पराभवनानंतर मुंबई इंडियन्सला विजयी सूर गवसला आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 8 गडी आणि 43 चेंडू राखून पराभव केला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली आहे असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण असं असलं तरी रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पहिल्या षटकापासून वजन टाकून होती. पदार्पणाच्या सामन्यात अश्वनी कुमारने 4 विकेट घेतल्या. तर मुंबई इंडियन्सने कोलकात्याने दिलेलं 117 धावांचं टार्गेट 2 गडी गमवून 12.5 षटकात पूर्ण केलं. यात रायन रिकल्टन याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 9 चेंडूत 27 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि 2 षटकार मारले. पण कोणताही दबाव नसलेल्या या सामन्यात रोहित शर्माने 12 चेंडूत फक्त 13 धावा केल्या. आंद्रे रसेलने त्याला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यातही काही खास केलं नव्हतं. चेन्नई विरूद्धच्या सामन्यात तर त्याला खातंही खोलता आलं नाही. तर गुजरातविरुद्ध फक्त 8 धावा केल्या. मागच्या 10 सामन्यांचा रोहित शर्माचा रेकॉर्ड पाहिलं तर चिंतेचा विषय आहे. यात त्याने एकूण 141 धावा केल्या आहेत. तर 2022 पासून त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या सहा षटकात तर 29 वेळा बाद झाला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम वृद्धिमान साहाच्या नावावर होता. साहा 24 वेळा असा बाद झाला आहे.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) March 31, 2025
असं सर्व रोहित शर्माच्या आसपास घडत असताना फ्रेंचायझी मालक निता अंबानी यांनी रोहित शर्मासोबत चर्चा केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचा हा व्हिडीओ आहे. यात त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव फक्त दिसत आहेत. पण नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीच स्पष्ट नाही. क्रीडाप्रेमी मात्र त्यांच्या पद्धतीने अंदाज बांधत आहेत. दरम्यान, रोहित शर्माचा फॉर्म पाहता तिसऱ्या सामन्यात त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवलं होतं. ओपनिंगला येणार हे सर्वांना माहिती होतं. पण या सामन्यातही फेल गेला. मुंबईचा पुढचा सामना 4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे.