दिल्ली : वर्ल्डकप चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दुसरा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरीची वाट मोकळी होणार आहे. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत बिनबाद 21 या धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा नाबाद 13, तर केएल राहुल नाबाद 4 धावसंख्येवर आहे. एकही विकेट न गमवता आजचा दिवस काढायचा रोहित शर्माचा मानस होता आणि पहिल्या दिवसअखेर झालंही तसंच. पण शेवटच्या षटकात पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे रोहित शर्मा भडकल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं शेवटचं षटक लायन नाथनच्या हाती सोपवलं होतं. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा बाद असल्याचं अपील करण्यात आलं आणि पंचांनी बाद घोषित केलं. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता रोहितनं डीआरएस रिव्ह्यू घेतला.
पहिल्या दिवसाचं शेवटचं षटक असल्याने रोहित सावधपणे खेळत होता. नाथन लायनच्या तिसऱ्या चेंडूवर शॉर्ट लेगला झेल घेतल्याचं अपील करण्यात आलं. त्यानंतर पंचांनी बादही दिलं पण रिव्ह्यूमध्ये लाबुसचेंननं घेतलेला झेल बॅटला लागला नव्हता हे स्पष्ट झालं. हा चेंडू पॅडला लागल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) February 17, 2023
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजा साथ देण्यासाठी मार्नस लाबुसचेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. मात्र मधल्या फळीच्या हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन (6) धावा करत बाद झाले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.