रोहित शर्माने इंग्लिश खेळाडूला दिलं चोख प्रत्युत्तर, ऋषभ पंतचं नाव घेत म्हणाला…
भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापू्र्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. बेन डकेटने यशस्वी जयस्वालवर केलेल्या टीपण्णीनंतर कर्णधार रोहित शर्माने त्याची बोलती बंद केली आहे. ऋषभ पंतचं उदाहरण देऊन एका वाक्यातच चर्चा संपवली आहे.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून सुरु होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. मात्र भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अजूनही खलबतं सुरु आहेत. असं असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तसेच इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटच्या एका वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी रोहित शर्माने ऋषभ पंत याचं नाव घेत एका वाक्यातच उत्तर संपवलं. मालिकेत यशस्वी जयस्वाल आक्रमकपणे फलंदाजी करत आहे. या मालिकेत त्याने दोन वेळेस द्विशतक ठोकलं आणि खास खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला. यावरून बेन डकेटने यशस्वी जयस्वालच्या आक्रमक शैलीवर भाष्य केलं होतं. यशस्वी जयस्वालच्या आक्रमक शैलीचं पूर्ण श्रेय हे इंग्लंडला जातं, असं बेन डकेट म्हणाला होता. इंग्लंडची बेझबॉल रणनिती गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडला बराच फायदा झाला आहे.
बेन डकेटच्या या वक्तव्यानंतर कर्णधार रोहित शर्मा गप्प बसेल असं होईल का? त्यानेही पत्रकार परिषदेत शालजोडीतून बेन डकेटला हाणले. जयस्वालच्या आक्रमक शैलीचं श्रेय इंग्लंडला जातं, या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ‘भारतीय संघात एक ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता. कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलं नाही.’, असं रोहित शर्मा म्हणाला. ऋषभ पंतच्या आक्रमक शैलीचं यावेळी रोहित शर्माने उदाहरण दिलं. ऋषभ पंत सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. आता आयपीएल 2024 स्पर्धेत चमकदार कामगिरीसाठी तयार होत आहे.
डोमेस्टिक क्रिकेटबाबतही रोहित शर्माने आपलं मत जोकरसपणे मांडलं. “सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. जिथपर्यंत त्यांना मेडिकल टीम प्रमाणपत्र देत नाही. हे सर्वांसाठी आहे. मी मुंबई विरुद्ध तामिळनाडु रणजी ट्रॉफी सामना पाहिला. देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देणं गरजेचं आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
पाचव्या कसोटी सामन्यातून रजत पाटिदारचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यात रजत पाटिदार छाप पाडण्यात अयशस्वी ठरला. सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीपने आपली छाप सोडली आहे. त्यामुळे रजत पाटिदार ऐवजी पाचव्या कसोटीत देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.