Rohit Sharma : भावूक हार्दिक पांड्याला रोहित शर्माने मारली मिठी आणि गालावर किसही.. इमोशनल Videoने अनेकांचं मन जिंकलं

| Updated on: Jun 30, 2024 | 8:47 AM

T20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी हार्दिक पंड्याला संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. कारण रोहित शर्माच्या जागी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला होता. हा निर्णय कोणालाच न आवडल्याने पांड्यावर बरीच टीका, ट्रोलिंग झाले होते. मात्र एका महिन्यानंतर सर्व चित्र बदललेलं दिसत आहे.

Rohit Sharma : भावूक हार्दिक पांड्याला रोहित शर्माने मारली मिठी आणि गालावर किसही.. इमोशनल Videoने अनेकांचं मन जिंकलं
Image Credit source: social media
Follow us on

17 वर्षांनी टीम इंडियाने प्रत्येक दिग्गज खेळाडू आणि करोडो भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 वर्ल्डकप 2024 चे विजेतेपद पटकावले. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे अनेक स्टार्स होते आणि त्यात एक नाव सर्वात खास होते – हार्दिक पांड्या. अखेरच्या षटकात हार्दिकने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि तो स्पर्धेचा हिरो ठरला. या विजयानंतर टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू भावूक झाला होता आणि याच इमोशनल मूमेंटमध्ये टीमचा कर्णधार रोहित शर्माने असे काही केले की ते पाहून सर्व पुन्हा इमोशनल झाले पण त्यांच्या चेहऱ्यावर एक हसूही आलं.

रोहितने हार्दिक केल किस, मारली मिठी

टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानावर तिरंगा अभिमानाने फडकत होता. प्रत्येक खेळाडूच्या हातात देशाचा सुंदर ध्वज होता आणि ते मोकळेपणाने आपल्या भावना, आनंद व्यक्त करत होते. याच वेळी मैदानावर काही खेळाडू टूर्नामेंट ब्रॉडकास्टरशी संवाद साधत होते. त्यावेळी हार्दिक पंड्या हा देखील स्टार स्पोर्ट्सच्या प्रतिनिधीशी बोलत होता. मात्र त्याच इंटरव्ह्यूदरम्यान जे घडलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. हार्दिकचा इंटरव्ह्यू सुरू असतानाच रोहित शर्मा अचानक मध्ये घुसला आणि त्याने कोणताही संकोच न बाळगता, कोणाचीच पर्वा न करता सरळ हार्दिक पांड्याला घट्ट पकडलं, त्याच्या गालावर किस करून आनंद व्यक्त केला आणि त्याला मिठी मारली. रोहितच्या या कृतीने हार्दिकच्या चेहऱ्यावरही हसू फुललं. हा व्हिडीओ समोर येताच बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला, हिट झाला आणि तो पाहून सगळेच आनंदले.

 

फायनलमध्ये हार्दिकने दिली मॅचला कलाटणी

रोहितच्या या प्रेमामुळे, या कृतीमुळे हार्दिक इमोशनल झाला असला तरी, तो प्रेमाला पूर्णपणे पात्र होता. अंतिम फेरीत त्याने प्रथम 2 चेंडूत 5 धावा केल्या आणि साऊथ आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना नंतर 17 व्या षटकात सामन्याचा रोख पूर्णपणे बदलत कलाटणी दिली. हेनरिक क्लासन हा अतिशय स्फोटक खेळी खेळत होता आणि दक्षिण आफ्रिकेला 24 चेंडूत फक्त 26 धावा हव्या होत्या. मात्र त्यावेळी 17 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकने क्लॉसेनची विकेट घेत टीम इंडियासाठी पुनरागमन केले आणि त्यानंतर 20 या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरची विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिकने 3 षटकात फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले.

टूर्नामेंटमध्ये शानदार खेळ

एकूणच, ही संपूर्ण (वर्ल्डकप) स्पर्धा हार्दिकसाठी उत्कृष्ट होती, त्यामध्ये त्याने 151 च्या स्ट्राइक रेटने 144 धावा केल्या, तसेच तूफान गोलंदाजी करत 11 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी 17.36 होती. हार्दिकसाठी हा वर्ल्डकप खूपच खास होता, कारण विश्वचषकापूर्वी आयपीएल 2024 मध्ये तो सर्वांचे टार्गेट होता. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले आणि हे रोहित शर्मा आणि मुंबईच्या चाहत्यांना रुचलं नव्हतं. त्यातच, आयपीएलमध्ये संघाची कामगिरी आणि खुद्द हार्दिकची कामगिरी अजिबात चांगली नव्हती, त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत त्याच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्याला खूपच ट्रोल करण्यात आलं. आताही हार्दिकच्या नावाने नारे देण्यात येतील पण ते आनंदाचे असतील.