ऋषभ पंत कुठाय, ऋषभ पंत कुठाय विचारत होता ना, घ्या आता! रोहितकडून खिल्ली
146/2 अशी भारताची परिस्थिती असताना, तिसरी विकेट गेल्यावर ऋषभ पंतला फलंदाजीला पाठवण्यात आलं, त्यामुळे तुला आश्चर्य वाटलं का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला.
लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे. भारताचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला पराभव आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं. भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं, मात्र त्याच्या शतकाला विजयाचा टिळा लागला नाही.
या सामन्यात भारतीय फलंदाजांना धावांची गती राखता आली नाही. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यासारखे मोठे फटके मारण्याची क्षमता असलेले फलंदाज मैदानात होते, तरीही त्यांना सिक्सर मारता आला नाही. भारताचा पहिला षटकात 50 व्या षटकात धोनीने मारला.
या सामन्यात भारताने विजय शंकरऐवजी ऋषभ पंतला संधी दिली होती. पंतने 29 चेंडूत 32 धावा केल्या. ऋषभ पंत कसेही फटके मारत होता. कॉमेंट्री करत असणारे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग किंवा लक्ष्मणसह अनेकजण पंतने सरळ बॅटने फटके मारावे असं म्हणत होते. मात्र ऋषभ पंत कधी रिव्हर्स शॉट, कधी न बघताच बॅट फिरवत होता.
मॅच संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत उपकर्णधार रोहित शर्माला ऋषभ पंतच्या फलंदाजीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी रोहित शर्माने ऋषभच्या फलंदाजीवरुन टोमणे मारले.
146/2 अशी भारताची परिस्थिती असताना, तिसरी विकेट गेल्यावर ऋषभ पंतला फलंदाजीला पाठवण्यात आलं, त्यामुळे तुला आश्चर्य वाटलं का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला, “मला कोणतंही आश्चर्य वाटत नाही. कारण तुम्हा सर्वांनाच (मीडियाला) ऋषभ पंत हवा होता. भारतापासून आम्हाला विचारण्यात येत होतं, ऋषभ पंत कुठाय, ऋषभ पंत कुठाय? तो इथे नंबर 4 वर आहे”
Vice-captain @ImRo45 lightened up the post-match press conference when asked about Rishabh Pant ?? #TeamIndia #ENGvIND #CWC19 pic.twitter.com/NSv3zVqFT3
— BCCI (@BCCI) June 30, 2019
ऋषभची आक्रमक फलंदाजी
या सामन्यात ऋषभ पंत चौथ्या नंबरवर फलंदाजीला आला. कोहली बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या पंतने वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. रोहित (102) बाद झाल्यानंतर पंत आणि हार्दिकने 28 धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंतचा सीमारेषेजवळ वोक्सने अप्रतिम झेल टिपला आणि तो माघारी परतला.
संबंधित बातम्या
जिंकण्यासाठी खेळले की नाही? धोनी-केदारच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव