‘रोहित शर्मा वर्ल्डकप खेळणार नाही’, माजी क्रिकेटपटूनं स्पष्टच सांगितलं
आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेकडे क्रीडारसिकाचं लक्ष लागून असतं. कारण या स्पर्धा ठरावीक वर्षानंतर होतात. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतं. असं असताना रोहित शर्मा आगामी वर्ल्डकप स्पर्धेत नसेल असं भाकीत माजी क्रिकेटपटूनं केलं आहे.
मुंबई: वन डे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल यात दुमत नाही. ही स्पर्धा पार पडल्यानंतर टी 20 वर्ल्डकप 2024 रोजी असणार आहे. मात्र या संघात दिग्गज खेळाडू खेळतील की नाही याबाबत साशंकता आहे. दिग्गज खेळाडूंचं वय पाहता त्यांना डावललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी चर्चा सुरु असताना, टी 20 वर्ल्डकप संघात रोहित शर्मा नसेल, असं माजी फलंदाज वसीम जाफर याने स्पष्टपणे सांगितलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली 2022 साली झालेल्या टी 20 वर्ल्डकप संघात होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र इंग्लंडकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. वसीम जाफरच्या मते आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये एकवेळ विराट कोहली खेळेल मात्र रोहित शर्मा खेळणं शक्यच नाही. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी वर्ल्डकपनंतर टी 20 सामने कमीच खेळले आहेत. तसेच निवड समितीकडून युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. वसीम जाफरच्या मते, रोहित शर्माने आपला शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वसीम जाफरनं सांगितलं की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा न्यूझीलँड आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत खेळले नाहीत. त्यांना आराम दिला गेला कारण त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर आयपीएल आणि वनडे वर्ल्डकप आहे. भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही धडक मारू शकते. माझ्या मते टी 20 वर्ल्डकप यंगस्टर्ससाठी आहे. मला वाटत नाही रोहित शर्मा पुढचा टी 20 वर्ल्डकप खेळेल.”
“एकवेळ टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली खेळू शकतो. पण रोहित शर्मा नक्कीच खेळणार नाही. कारण आता रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याचं टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळणं कठीणच आहे. याच कारणामुळे रोहित आणि विराटला आराम दिला गेला होता. कारण ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळू शकतील.”, असं स्पष्टपणे वसीम जाफरनं सांगितलं.
रोहित शर्माचं क्रिकेट कारकिर्द
रोहित शर्माने आतापर्यंत 148 सामने खेळले आहेत. त्यापैकी 140 सामन्यात फलंदाजी केली आहे. 4 शतकं आणि 29 अर्धशतकांच्या जोरावर 3853 धावा केल्या आहेत. 118 हा रोहित शर्माचा सर्वाधिक स्कोअर आहे. रोहित शर्माने आपला पहिला टी 20 सामना 19 सप्टेंबर 2007 इंग्लंडविरुद्ध खेळला होता. मात्र त्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपण्यात आली होती.