Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar corona) याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिनने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. (Sachin Tendulkar corona tests positive for COVID19)
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी सचिनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
सचिन तेंडुलकरचं ट्विट
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारी मी घेत आहे, असं सचिनने म्हटलं आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग
सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने धुवांधार बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा फटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या
राज्यात काल 26 मार्चला दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर आले आहे. काल दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या
R Madhavan Corona Positive : मित्रांना कोरोनाने गाठले, आमिर खानपाठोपाठ आर. माधवनलाही कोरोनाची लागण