संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला
पंजाब विरुद्ध संजू सॅमसनने 85 धावांची खेळी केली. (Inc Shashi Tharoor Tweet About Sanju Samson)
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) यांच्यात 27 सप्टेंबरला आयपीएलमधील (IPL 2020) 9 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थानने पंजाबवर 4 विकेटने मात केली. राहुल तेवतियाने (Rahul Tewatiya) केलेल्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने हा विजय मिळवला. मात्र त्याआधी संजू सॅमसनने (Sanju Samson) राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. त्याने महत्वपूर्ण 85 धावांची खेळी केली. याखेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. संजू सॅमसनच्या या खेळीचं काँग्रेसचे नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे. संजू हा भविष्यातला धोनी असल्याचं थरुर यांनी म्हटलं आहे. (Inc Shashi Tharoor Tweet About Sanju Samson)
शशी थरुर काय म्हणाले ?
“राजस्थानने पंजाब विरुद्ध मिळवलेला विजय हा चित्तथरारक होता. मी संजू सॅमसनला गेल्या 10 वर्षांपासून ओळखतो. एकेदिवशी तु भविष्यातील महेंद्रसिंह धोनी बनणार, असं मी संजूला त्याच्या वयाच्या 14 व्या वर्षी सांगितलं होतं. आज तो दिवस उजाडला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन सामन्यात संजूने दमदार खेळी केली. यानंतर संजू जागतिक विश्वविख्यात खेळाडू म्हणून नावारुपाला आला आहे”, शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
What an absolutely incredible win for @rajasthanroyals ! I’ve known @iamSanjuSamson for a decade & told him when he was 14 that he would one day be the next MS Dhoni. Well, that day is here. After his two amazing innings in this IPL you know a world class player has arrived.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 27, 2020
गौतम गंभीरचे प्रत्युतर
मात्र शशी थरुर यांनी केलेल्या ट्विटला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) प्रत्युतर दिलं आहे. शशी थरुर यांचे ट्विट शेअर करत गंभीर म्हणाला की, “संजूला कोणासारखं बनण्याची गरज नाही, संजूने त्याचं स्वत:च अस्तित्व सिद्ध केलं आहे. संजू क्रिकेटमधील ‘द संजू सॅमसन’ राहिल” असं गंभीर म्हणाला.
Sanju Samson doesn’t need to be next anyone. He will be ‘the’ Sanju Samson of Indian Cricket. https://t.co/xUBmQILBXv
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 27, 2020
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संजू सॅमसनने राजस्थानकडून 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आहे. चेन्नई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने 74 धावा केल्या. तर पंजाब विरोधातील दुसऱ्या सामन्यात 85 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यात त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
गंभीरची धोनीवर टीका
गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी भारताचा माजी आणि चेन्नईचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर टीका केली. राजस्थान रॉयल्स विरोधातील सामन्यात चेन्नईचा 16 धावांनी पराभव झाला होता. या पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वावर गंभीरने सडकून टीका केली. “थोडं आश्चर्यच वाटलं. धोनी बॅटिंगसाठी चक्क सातव्या क्रमांकावर येतो? धोनी, तुला ऋतुराज गायकवाड आणि सॅम करनला पुढे पाठवून काय सिद्ध करायचं होतं. तु चेन्नईचा कर्णधार आहेस. निर्णायक क्षणी पुढे येऊन नेतृत्व करणं अपेक्षित होतं”, अशा शब्दात गंभीरने धोनीवर टीका केली होती.
संबंधित बातम्या :
गौतम गंभीरकडून संजू सॅमसनचं कौतुक, चाहते म्हणाले, रिषभचं करिअर संकटात
IPL नाही, तर धोनी पुनरागमन कसं करणार? : गौतम गंभीर
(Inc Shashi Tharoor Tweet About Sanju Samson)