शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तानचीच काढली लायकी अन् भारताचं कौतुक करत, म्हणाला…
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने त्या वादावर बोलताना पाकिस्तानचीच लायकी काढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे भारताचं कौतुक केलं आहे.
मुंबई : यंदाचा आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनीही आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानही वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार नसल्याचं सांगितलं होतं. यावरून गेल्या काही दिवसांमागे बराचसा वाद पाहायला मिळाला होता. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने यावर बोलताना पाकिस्तानची लायकी काढलेली दिसत आहे. तर दुसरीकडे भारताचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाला आफ्रिदी?
एखाद्या देशाला आपल्या पायावर उभं राहता येत नसेल तर त्या देशासाठी एखादा निर्णय घेणं सोपं नसतं. भारत जर काही निर्णय घेत असेल तर त्यांनी स्वत:ला तितकं मजबूत केलं आहे. त्यामुळे ते उघडपणे बोलत आहेत. तुम्ही स्वत: ला तितकं बळकट करा मग अशा प्रकारचे निर्णय घ्या. मला माहित नाही की भारत आशिया कप खेळण्यासाठी भारतात येईल की नाही? किंवा पाकिस्तान भारतात जाईल पण यामध्ये आयसीसीने मध्यस्थी करत भूमिका घ्यावी. मात्र आयसीसी बोर्डाचेही बीसीसीआयसमोर काही चालणार नाही, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने या वादावर आपलं मत मांडलं आहे.
भावनिक होऊन मीपण म्हणेल की पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची गरज नाही. पण हा निर्णय अतिशय विचारपूर्वक करून घ्यायला पाहिजे. अनेक गोष्टी लक्षात घेत तुम्हाला तुमची आर्थिक व्यवस्था पाहावी लागेल. कारण आता तुमची वाईट अवस्था असल्याने तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेतला नाही पाहिजे, असंही आफ्रिदीने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या एका टीव्ही शोमध्ये आफ्रिदी बोलत होता.
आगामी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान भारतामध्ये गेला नाहीतर जवळपास 30 मिलिअन डॉलरचं नुकसान होणार आहे. इतकंच नाहीतर दक्षिण आफ्रिका संघाला याचा फायदा होणार आहे. आफ्रिकेला क्वालिफायर सामना खेळावा लागणार नाही. आशिया कपचं आयोजन पाकिस्तानच्याऐवजी दुसऱ्या देशात करावं अशी मागणी केली आहे.
दरम्यान, आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येणार नसेल तर वर्ल्ड कपसाठी भारतातही पाकिस्तान संघ जाणार नसल्याचं रमीझ राझा यांनी म्हटलं होतं. मात्र रमीझ राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे.