WTC 2023 : “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हा खेळाडू खेळणारच”, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आतापासून बीसीसीआयने कंबर कसली आहे. आयसीसी चषकांचा इतका वर्षांच्या दुष्काळ संपवण्यासाठी चांगल्या खेळाडूंची संघात निवड केली जाणार आहे. त्यात माजी कर्णधार सौरव गांगुली एका खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोणत्या खेळाडूंची निवड होणार याबाबत आतापासून तयारी सुरु झाली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने एका परमनंट खेळाडूचं नाव देखील जाहीर केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत शुबमन गिल खेळणारचं असं त्याने ठामपणे सांगितलं आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी प्लेईंग 11 ची निवड करताना शुभमनच्या नावावर डोळे झाकून टिक करावी, असा सल्लाही गांगुलीने दिला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात 7 जूनपासून 11 जूनपर्यंत असणार आहे. तर 12 जून हा दिवस व्यत्यय आल्यास राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या केएल राहुल खराब फॉर्मात आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात शुभमन गिलला संधी देण्यात आली. त्या संधीचं शुबमननं सोनं केलं. चौथ्या कसोटीत शतक झळकावत आपलं अस्तित्व सिद्ध केलं.
शुभमन गिलकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. जेव्हा केएल राहुलने फॉर्म गमावला आणि पृथ्वी शॉची फलंदाजीतील टेक्निकल बाब ऑस्ट्रेलियात उघड झाली. तेव्हा शुभमन गिलला पदार्पण करण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियानंतर गिलला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आणि संघातील स्थान गमावलं.
इंग्लंड दौऱ्यात केएल राहुलला संधी मिळाली आणि त्याने ती धरुन ठेवली. त्यामुळे गिलला कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ वाट पाहावी लागली. या दरम्यान त्याने बांगलादेशमध्ये पहिलं कसोटी शतक झळकावलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीत जबरदस्त फलंदाजी करत शतकी खेळी केली.
“पहिल्यांदा टीम इंडियाचं अभिनंदन त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे. इंग्लंडमध्येही विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे नक्की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम जिंकतील. फलंदाजी करताना 350 ते 400 केल्यास जिंकण्याची संधी वाढेल. प्लेईंग 11 मध्ये शुभमन गिल असेलच. गेल्या सहा ते सात महिन्यात त्याने चांगली खेळी केली आहे. अजून काय करायला हवं. तो आता परमनंट प्लेयर आहे.”, असं सौरव गांगुलीने सांगितलं.
“अश्विन आणि जडेजा दोघंही चांगलं करत आहे. अक्षर पटेलनेही चांगली कामगिरी केली आहे. तिघांना फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्यामुळे जडेजा, अश्विन आणि अक्षर भारतीय संघांची स्ट्रेंथ आहे.” असंही गांगुलीने पुढे सांगितलं.