CAA विरोधात सना गांगुलीची पोस्ट, दादा म्हणतो…
सौरव गांगुलीची मुलगी सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये लेखक खुशवंत सिंह यांच्या 'The End Of India' या पुस्तकातील एक किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा सत्ता आणि जातीय भेदभावावर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत (CAA). या कायद्याविरोधात आता देशातील प्रत्येक क्षेत्रातील लोक आवाज उठवत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची मुलगी सना गांगुलीनेही (Sana Ganguly) या कायद्याविरोधात एक पोस्ट लिहिली. या पोस्टवरुन सध्या एक नवा वाद उद्भवला आहे. या प्रकरणी गांगुलीने आपल्या लेकीची बाजू सावरत सध्या राजकीय गोष्टी समजून घेण्यासाठी ती लहान असल्याचं सांगितलं. गांगुलीच्या या वक्तव्याला त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीशी जोडलं जात आहे (Sourav Ganguly Tweet).
Please keep Sana out of all this issues .. this post is not true .. she is too young a girl to know about anything in politics
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 18, 2019
सना गांगुलीने काय पोस्ट केली?
सौरव गांगुलीची मुलगी सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये लेखक खुशवंत सिंह यांच्या ‘The End Of India’ या पुस्तकातील एक किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा सत्ता आणि जातीय भेदभावावर प्रश्न उपस्थित करणारा आहे. याला नागरिकत्व सुधारणा कायद्याशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोशल मीडियावर एक नवा वाद सुरु झाला आहे. याबाबत सौरव गांगुलीने ट्वीट केलं आणि आपल्या मुलीच्या बचावात ‘तिला राजकारण कळत नाही, ती अजून खूप लहान आहे, कृपया तिला राजकारणापासून दूर ठेवा’, असं म्हटलं.
सना गांगुलीचं वय 18 वर्ष आहे. तिचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 रोजी झाला. कायद्यानुसार सना गांगुली ही सज्ञान आहे आणि स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहे. पण ज्याप्रकारे सौरव गांगुलीने आपल्या मुलीच्या पोस्टला बालिश असल्याचं सांगितलं, त्यामुळे सौरव गांगुलीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुलीचा बचाव की भविष्याची रणनीती?
गेल्या अनेक काळापासून सौरव गांगुली हे बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा चेहरा असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सौरव गांगुली आणि भाजपने ही बाब वारंवार फेटाळली आहे. सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव झाले. तेव्हापासूनच दादा आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे.
आज देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याचा सर्वत्र विरोध होत आहे. मोदी सरकार संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे. या परिस्थितीत सौरव गांगुलीच्या मुलीकडून सरकारविरोधात पोस्ट सौरव गांगुलीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी घातक ठरु शकते, असंही बोललं जात आहे.
बंगालमध्ये 2021 ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या सौरव गांगुली 9 महिन्यांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर ते राजकारणात एन्ट्री घेऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.
पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बनर्जी मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात निवडणुकांची तायरी करत आहे. पण राज्यात त्यांना एका बड्या चेहऱ्याची गरज आहे. राजकीय विश्लेशकांच्या मते सौरव गांगुली तो चेहरा होऊ शकतात. प्रिन्स ऑफ कोलकाता, बंगाल टायगर या नावांनी प्रसिध्द असलेले सौरव गांगुली आजही बंगालमध्ये एक मोठं नाव आहे. याचा फायदा भाजप घेऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.