नवी दिल्ली : आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी आज खाप महापंचायत होणार आहे. या दरम्यान सरकारने आंदोलक कुस्तीपटूंसोबत चर्चेसाठी तयार असल्याच म्हटलं आहे. कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलवण्यात आलय, असं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी रात्री उशिरा सांगितलं. दोन दिवसांपूर्वी कुस्तीपटूंचा एक गट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटला होता. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावलय. कुस्तीपटू सरकारसमोर आपल्या तीन मागण्या मांडू शकतात.
भारताचे युवा विषयक आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी रात्री उशिरा टि्वट केलं. सरकार कुस्तीपटूंसोबत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. अमित शाह यांना भेटण्याआधी आंदोलक कुस्तीपटू अनुराग ठाकूर यांना सुद्धा भेटले होते. जवळपास दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली होती.
काय असतील तीन मागण्या?
बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करतील.
रेसलिंग फेडरेशनचा अध्यक्ष निवडण्याची सुद्धा मागणी करु शकतात.
कुस्तीपटूंसाठी चांगलं, सुदृढ वातावरण निर्मितीची तिसरी मागणी करु शकतात.
खाप महापंचायतीला कोण उपस्थित राहणार?
भाजपाच खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची प्रमुख मागणी आहे. त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज खाप महापंचायत बोलवण्यात आली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खाप महापंचायतीला विनेश फोगाट आणि संगीता फोगाट उपस्थित राहतील.
पदक विजेते कुस्तीपटू
दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये 2021 टोक्यो ऑलिम्पिंकमध्ये कास्य पदक जिंकणारे कुस्तीपटू सुद्धा आहेत.
चौकशी कोणाकडून सुरु आहे?
कुस्तीपटूंच आंदोलन आणि सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर 28 एप्रिलला दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले. पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलीस आणि एसआयटी या प्रकरणात चौकशी करत आहे.