श्रीशांत लवकरच मैदानात परतणार?
नवी दिल्ली: स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झालेल्या क्रिकेटपटू एस श्रीशांतने आपल्यावरील आजीवन बंदी उठवावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवली जाऊ शकते, मग माझ्यावरील का नाही, असा सवाल श्रीशांतने उपस्थित केला आहे. आयपीएलच्या 2013 मधील हंगामात श्रीशांतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पकडलं होतं. मात्र 2015 मध्ये दिल्लीतील न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची मुक्तता […]
नवी दिल्ली: स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झालेल्या क्रिकेटपटू एस श्रीशांतने आपल्यावरील आजीवन बंदी उठवावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवली जाऊ शकते, मग माझ्यावरील का नाही, असा सवाल श्रीशांतने उपस्थित केला आहे. आयपीएलच्या 2013 मधील हंगामात श्रीशांतला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पकडलं होतं. मात्र 2015 मध्ये दिल्लीतील न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची मुक्तता केली. पण बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातल्याने, श्रीशांतने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
“स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे बीसीसीआयने माझ्यावर घातलेली आजीवन बंदी खूपच कठोर आहे. मी चार वर्षांपासून या बंदीचा सामना करत आहे” असं श्रीशांतने न्यायालयात सांगितलं. मला इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रस्ताव असल्याचंही त्याने कोर्टात नमूद केलं.
आजीवन बंदीमुळे श्रीशांत क्लब क्रिकेटही खेळू शकत नाही. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअरच संपलं आहे.
श्रीशांत म्हणाला, “मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर 2000 मध्ये आजीवन बंधी घालण्यात आली होती. मात्र ती बंदी जर हटू शकते, तर माझ्यावरील बंदी का हटू शकत नाही”?
आंध्र प्रदेश हायकोर्टाने 8 नोव्हेंबर 2012 मध्ये अझरुद्दीनवरील आजीवन बंदी बेकायदेशीर ठरवली होती. त्याआधारे आता श्रीशांतनेही आपल्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी केरळ हायकोर्टाने श्रीशांतवरील बंदी हटवली होती. मात्र खंडपीठाचा निर्णय त्याच्याविरोधात गेल्याने ही बंदी कायम राहिली. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला नोटीस पाठवून आपलं म्हणणं मांडण्यास बजावलं आहे. त्यासाठी कोर्टाने बीसीसीआयला 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता जानेवारी महिन्यात होणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
2013 मध्ये आयपीएल दरम्यान श्रीशांतला स्फॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. श्रीशांतसह अजीत चंडीला आणि अंकित चव्हाण यांनाही त्यावेळी अटक केली होती. या आरोपातून श्रीशांत पुराव्यांअभावी सुटला, मात्र त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. त्याविरोधात श्रीशांतने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.