अखेरच्या सामन्यात 3 विकेट्स घेऊन यॉर्कर किंगचा क्रिकेटला अलविदा
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 91 धावांनी विजय मिळवला. लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) हा अखेरचा वन डे सामना होता. त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्या अखेरच्या सामन्यात मलिंगाने 3 फलंदाजांना माघारी धाडलं आणि शेवटची विकेट घेऊन सामन्याचा समारोपही स्वतःच केला.
कोलंबो : श्रीलंकेने दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) विजयी निरोप दिलाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 91 धावांनी विजय मिळवला. लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) हा अखेरचा वन डे सामना होता. त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्या अखेरच्या सामन्यात मलिंगाने 3 फलंदाजांना माघारी धाडलं आणि शेवटची विकेट घेऊन सामन्याचा समारोपही स्वतःच केला.
प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने बांगलादेशसमोर 8 बाद 314 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेच्या कुसल परेराने 99 चेंडूत 111 धावांची खेळी करत श्रीलंकेला मोठं लक्ष्य गाठून देण्यात मदत केली. याशिवाय कुशल मेंडिस 43 आणि अँजेलो मॅथ्यूज 48 यांनीही मोलाचं योगदान दिलं. बांगलादेशच्या शफिउल इस्लामने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी धाडलं, तर मुस्ताफिजुर रहमानने दोन विकेट घेतल्या.
315 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला सर्वबाद 223 धावा करता आल्या. सलामीवीर तमीम इकबालला मलिंगाने खातंही न उघडू देता माघारी पाठवलं. तर दुसरा सलामीवीर सौम्य सरकारला मलिंगानेच 15 धावांवर बाद केलं. बांगलादेशकडून मुश्फीकुर रहमानने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली, त्याला 60 धावाकरुन सब्बीर रहमानने साथ दिली.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करत दबाव वाढवला. यजमान श्रीलंकेच्या मलिंगाने 3, नुवन प्रदीपने 3 धनंजय डी सिल्वाने 2 आणि लहिरु कुमाराने एका फलंदाजाला माघारी धाडलं.
मलिंगाची कारकीर्द
मलिंगाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 जुलै 2004 रोजी कसोटी पदार्पण केलं होतं. तर वन डे पदार्पण त्याने 17 जुलै 2004 रोजी केलं. गेल्या 15 वर्षांमध्ये त्याने अनेक ऐतिहासिक विक्रम नावावर केले. त्याने अखेरचा कसोटी सामना 3 ऑगस्ट 2010 रोजी भारताविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो कसोटी संघापासून दूर राहिला. पण वन डे क्रिकेटमध्ये अनेक चढ उतार अनुभवत त्याने कामगिरीत सातत्य ठेवलं.
मलिंगाने 30 कसोटी सामन्यांमध्ये 51.57 च्या सरासरीने 101 विकेट्स घेतल्या, तर 225 वन डे सामन्यामध्ये त्याच्या नावावर 335 विकेट्स झाल्या आहेत. याशिवाय 73 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या खात्यात 97 विकेट्स आहेत.
VIDEO : मलिंगाची अखेरची ओव्हर
Malinga’s Last Over in ODI, Last Ball, Last Wicket and Last Moment in ODI match. #Malinga #LasithMalinga pic.twitter.com/w5ExLFA1q1
— Yuvraj Rimal (@y_rimal) July 26, 2019