श्रीलंकेला मोठा झटका, वर्ल्ड कपमधून थेट पत्ता कट, आता जर-तरचं समीकरण
न्यूझीलँड विरुद्धची वनडे मालिका श्रीलंकेने 2-0 ने गमावली आहे. मालिका पराभवासह श्रीलंकेचं वनडे वर्ल्डकपमधील थेट साखळी फेरीत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता श्रीलंकेला पात्रता फेरीत खेळून स्थान निश्चित करावं लागेल.
मुंबई : श्रीलंकन संघाला आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी मोठा धक्का बसला. न्यूझीलँड विरुद्ध सुरु असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने गमावल्याने नुकसान झालं आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये थेट क्वालिफाय करण्याचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे श्रीलंकेला आता साखळी फेरीपूर्वी असलेल्या पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे. पात्रता फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर साखळी फेरीत स्थान मिळेल. न्यूझीलँड संघाने वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय केलं आहे. तर श्रीलंकेकडे शेवटचा सामना जिंकत प्रवेश करण्याची संधी होती. पण सामना गमावल्याने नामुष्की ओढावली आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत एकूण 10 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी सात संघांनी आधीच क्वालिफाय केलं आहे. वर्ल्डकप 2023 सुपर लीग अंतर्गत गुणतालिकेत वरच्या 8 संघांना थेट क्वालिफाय केलं जातं. मात्र न्यूझीलँडविरुद्धचा शेवटचा सामना गमवल्याने गुणतालिकेत श्रीलंका नवव्या स्थानावर घसरली आहे. त्यामुळे जून महिन्यात पात्रता फेरी खेळत आपलं स्थान निश्चित करावं लागणार आहे.
न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका
तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलँडने श्रीलंकेसमोर सर्वबाद 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकात 76 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलँडला सर्वबाद 157 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलँडने 33 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.
आठव्या स्थानासाठी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत रस्सीखेच
दुसरीकडे, आठव्या स्थानासाठी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत असणार आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत आपले सर्व वनडे सामने खेळले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला अजूनही दोन सामने खेळायचे आहेत. वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचे सर्व 24 सामने झाले असून सध्या गुणतालिकेत 88 गुण आहेत. त्यामुळे सर्व गणित दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून असणार आहे.
तर दक्षिण आफ्रिका 78 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका नेदरलँडविरुद्ध दोन वनडे खेळणार आहे. जर दोन्ही सामने जिंकले तर 98 गुण होतील आणि थेट साखळी फेरीत स्थान निश्चित होईल.भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांनी थेट वर्ल्डकपच्या साखळी फेरीत स्थान निश्चित केलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न केलं होतं भंग
न्यूझीलँडने यापूर्वी श्रीलंकेचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. श्रीलंकेला टेस्ट मालिकेत 2-0 ने पराभूत केल्याने थेट भारताला फायदा झाला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. मात्र जर तरच गणित असल्याने सर्व काही श्रीलंकेवर आधारित होतं. मात्र न्यूझीलँडने श्रीलंकेला पराभूत करत भारताची अंतिम फेरीची वाट मोकळी करून दिली होती.