….म्हणून स्टीव्ह स्मिथला पुन्हा कर्णधारपद मिळावं, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचं मत
ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दिग्गज खेळाडू मार्क वॉ ने स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्याविषयीचं मत मांडलं आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दिग्गज खेळाडू मार्क वॉ ने स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी देण्याविषयीचं मत मांडलं आहे. “स्टीव्ह स्मिथने बॉल टेम्परिंग प्रकरणात प्रायश्चित भोगलं आहे. टीम पेनच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियन टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा स्टीव्ह स्थिथकडे द्यायला हवी”, असं मत मार्क वॉ ने मांडलं आहे. (Steve Smith should get the captaincy again Say marc waugh)
स्मिथला 2018 च्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर कर्णधारपदावरुन दूर करण्यात आले होते. त्याच्यावर एक वर्षासाठी बंदीदेखील होती. भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी स्मिथला पुन्हा कर्णधारपद सोपवण्याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. अॅरॉन फिंचच्या दुखापतीच्या कारणामुळे मॅथ्यू वेडकडे दुसर्या टी -20 सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
“मी स्मिथला कर्णधार बनवलं असतं. तो संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि तो संघात नेहमीच निवडला जाईल. तो बर्याच वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे आणि त्याला क्रिकेटविषयी चांगली समज आहे”, असं मत फॉक्स स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत मार्क वॉ ने मांडलं.
स्मिथने 2015 ते 2018 दरम्यान 34 कसोटी, 51 एकदिवसीय आणि 8 टी-ट्वेन्टी सामन्यांचं ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलंय. स्टीव्ह स्मिथच्या कर्णधारपदाची क्रिकेट विश्वास नेहमी चर्चा होत असते. आपल्या चतुर डावपेचांसाठी तो क्रिकेट विश्वात ओळखला जातो.
“मला माहितीये की बहुतेक जण विचारतील की त्याच्याकडेच पुन्हा ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व का द्यायचं पण मला वाटतं त्याने त्याच्या चुकीचं प्रायश्चित भोगलंय. तो एक चांगला कर्णधार आहे आणि त्याच्याकडेच पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला हवी”, असं मार्क वॉ म्हणाला.
स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याविषयी ऑस्ट्रेलियन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये मत-मतांतरे आहेत. मार्क वॉने स्टीव्हला जरी कर्णधारपद देण्याविषयी मत प्रदर्शित केलं असलं तरी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नने स्मिथला बँटिंगकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलेला आहे.
संबंधित बातम्या
श्रीशांत इज बॅक… 7 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार!
मोहम्मद शमीच्या निशाण्यावर कांगारु, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत शमीवर मोठी जबाबदारी