INDvWI T-20: भारताचा वेस्ट इंडिजवर 4 विकेट्सने विजय, नवदीप सैनीही चमकला
भारताने आज (शनिवारी) सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिअममध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
फ्लोरिडा (अमेरिका) : भारताने आज (शनिवारी) सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडिअममध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत विंडीजला 100 धावांच्या आतच रोखले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी अपयशी ठरली. त्यांना 20 षटकांमध्ये 9 विकेट गमावत केवळ 95 धावांचा टप्पा गाठता आला.
विंडीजकडून केरन पोलार्डने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली, तर निकोलस पूरनने 20 धावा केल्या. विशेष म्हणजे आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याने 4 षटकांमध्ये केवळ 17 धावा दिल्या. यात त्याने एक षटक विनाधाव टाकले. भुवनेश्वर कुमारनेही 2 विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
दुसरीकडे 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघालाही हे लक्ष्य गाठायला चांगलेच झुंजावे लागले. 96 धावा करण्यासाठी भारताला 18 षटकं लागली. यात भारताने 6 विकेट्स देखील गमावल्या. भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 24 धावा केल्या. यात त्याच्या 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. कर्णधार विराट कोहली आणि मनिष पांडे यांनीही प्रत्येकी 19 धावांची खेळी केली.
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव तयार केला होता. यातच धावांचा वेग वाढवण्याच्या गडबडीत विंडीजच्या विकेट्स झटपट पडल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलदांज जॉन कॅम्पवेलने वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कृणाल पांड्याने त्याचा झेल टिपला. धावसंख्या 8 वर पोहचली असतानाच भुवनेश्वर कुमारने इंडिजचा दुसरा सलामीवीर फलंदाज इविन लुइसला बाद केले. निकोलसने पोलार्डसोबत भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र सैनीने विंडीजची धावसंख्या 28 असतानाच तिसरी विकेट घेतली. सैनीने त्याच्या पुढील चेंडूवर लगेचच शिमरन हेटमायेरला शून्यावरच बाद केले.
रोवमॅन पावेल 4 धावा करुन खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी विंडीजची स्थिती 5 बाद 33 धावा अशी झाली होती. यावेळी पोलार्डने वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटसोबत 6 व्या विकेटसाठी 34 धावांची भर घातली. यात कार्लोसने केवळ 9 धावा केल्या. विंडीजची धावसंख्या 67 झालेली असताना पांड्याने कार्लोसला बाद केले.
रविंद्र जडेजाने सुनील नरेन (2) आणि भुवनेश्वरने कीमो पॉलला (3) बाद करत विंडीजची स्थिती 88 धावांवर 8 बाद अशी केली. अखेर पोलार्डकडून चांगली धावसंख्या उभारण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र, सैनीने शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू केले. केवळ केरन पोलार्डनेच भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत इंडिजला 100 च्या जवळ नेले. पोलार्डने 49 धावांची खेळी केली. यात त्याच्या 4 षटकारांचा आणि 2 चौकारांचा समावेश आहे.
इंडिजच्या केवळ 2 खेळाडूंना दहाचा आकडा पार करता आला. भारताकडून सैनीच्या व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारने 2 विकेट आणि सुंदर, अहमद, पांड्या, जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.