मैदानात नमाज, दाढी चालते, मग धोनीच्या ग्लोव्जवर आक्षेप का? : तारक फतेह
वर्ल्डकपमध्ये मुस्लिम खेळाडूंची मिशीशिवायची दाढी चालते, पाकिस्तानी खेळाडू भर मैदानात नमाज पठण करतात ते चालतं, मग धोनीच्या ग्लोव्जवर आक्षेप का, असा सवाल तारक फतेह यांनी विचारला आहे.
#DhoniKeepTheGlove : मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्जवरील पॅरा मिलिट्रीच्या बलिदान बॅजमुळे सध्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आयसीसीने बीसीसीआयला पत्र पाठवून धोनीला तो बॅज हटवण्यास सांगितलं आहे. मात्र बीसीसीआय खंबीरपणे धोनीच्या मागे आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय आणि प्रशासक समिती (COA) ने धोनीला पाठिंबा दिला आहे. COA चे प्रमुख विनोद राय यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठिशी उभे आहोत. धोनीच्या ग्लोव्जवर जो बॅज आहे तो कोणत्याही धर्माचं प्रतिक नाही किंवा त्यामागे व्यावसायिक हेतूही नाही. राहिला मुद्दा वापरापूर्वी आयसीसीच्या परवानगीचा, त्यावर आम्ही आयसीसीकडे दाद मागू”
नमाज, दाढी चालते मग ग्लोव्ज का नाहीत?
दरम्यान, आयसीसीने धोनीच्या ग्लोव्जवर घेतलेल्या आक्षेपाला अनेक दिग्गजांनी उत्तर दिलं. पाकिस्तानात जन्मलेले आणि सध्या कॅनडाचे रहिवासी असलेले लेखक, पत्रकार तारक फतेह यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली आहे. वर्ल्डकपमध्ये मुस्लिम खेळाडूंची मिशीशिवायची दाढी चालते, पाकिस्तानी खेळाडू भर मैदानात नमाज पठण करतात ते चालतं, मग धोनीच्या ग्लोव्जवर आक्षेप का, असा सवाल तारक फतेह यांनी विचारला आहे.
तारक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात झाला. ते कॅनडात राहतात. भारत-पाक संबंधांवर त्यांनी अनेक लेखांमधून भाष्य केलं. ते नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या भूमिकांची चिरफाड करत असतात.
The @ICC has no problem with the entire Pakistan cricket team marking territory by praying on the cricket field, denigrating Christians and Jews (part of Muslim ritual prayer) but find insignia on @MSDhoni‘s gloves inappropriate. pic.twitter.com/8wwZYtnti2
— Tarek Fatah (@TarekFatah) June 6, 2019
काय आहे नेमका वाद?
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू महेंद्रसिंह धोनी सध्या ग्लोव्जवरील पॅरा मिलिट्रीच्या ‘बलिदान बॅज’मुळे चर्चेत आहे. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यादरम्यान धोनीने यष्टीरक्षणासाठी घातलेल्या ग्लोव्जवर पॅरा मिलिट्रीचा लोगो होता. या लोगोला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आक्षेप घेतला आणि तसे बीसीसीआयला कळवले.
या वादानंतर सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी धोनीच्या पाठिशी उभे राहून ग्लोव्ज हटवू नये असं म्हटलं. सोशल मीडियावरुन #DhoniKeepTheGlove अशी मोहीम राबवली जात आहे. आयसीसीचा निषेधही व्यक्त करण्यात येत आहे.
धोनीच्या हातावर असलेला लोगो तातडीने हटवण्यात यावा, असं आवाहन आयसीसीने बीसीसीआयला केलं. आयसीसीचे महासंचालक आणि रणनीती समन्वयक क्लेयर फरलोंग यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर बीसीआयने आयसीसीला दिलेल्या उत्तरात म्हटलंय की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या बाजूने आहोत. ‘बलिदान बॅज’ हे कुठल्याही धर्माचं प्रतिक किंवा व्यावसायिक चिन्ह नाही.”
‘बलिदान बॅज’ काय आहे?
पॅरा मिलिट्रीच्या जवानांकडे ‘बलिदान बॅज’ नावाचं वेगळं बॅज असतं. ‘बलिदान’ असे या बॅजवर देवनागरी लिपीत लिहिलेलं असतं. चांदीपासून बनललेल्या या बॅजच्या वरील बाजूस लाल प्लास्टिकचं आवरण असतं. केवळ पॅरा कमांडोंकडे हे बॅज असतं.
धोनीकडे ‘बलिदान बॅज’ कसं?
धोनीला 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टिनंट कर्नल ही मानद उपाधी मिळाली आहे. शिवाय धोनीने त्याच्या रेजिमेंटसोबत विशेष ट्रेनिंगही घेतली होती. सैन्याविषयीचा आदर धोनीने वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे. सैन्यात जाण्याची इच्छा त्याने अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे.