न्यूझीलंडमध्ये इतिहास रचण्यापासून भारत फक्त एक पाऊल दूर
हॅमिल्टन : वर्ल्ड क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघाकडे आणखी एक ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात विजय मिळवल्यास परदेशात आणखी एक विक्रम भारताच्या नावावर होणार आहे. न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय मालिकेत हा भारताचा पहिलाच टी-20 मालिका विजय असेल. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकली, न्यूझीलंडला त्यांच्याच देशात वन डे मालिकेत […]
हॅमिल्टन : वर्ल्ड क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघाकडे आणखी एक ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात विजय मिळवल्यास परदेशात आणखी एक विक्रम भारताच्या नावावर होणार आहे. न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय मालिकेत हा भारताचा पहिलाच टी-20 मालिका विजय असेल. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली कसोटी मालिका जिंकली, न्यूझीलंडला त्यांच्याच देशात वन डे मालिकेत धूळ चारली. आता टी-20 मध्ये जिंकण्याची संधी आहे.
न्यूझीलंड वि. भारत टी 20 मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण दुसऱ्या सामन्यात भारताने कमबॅक करत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. त्यामुळे रविवार हा भारतीय प्रेक्षकांसाठी सुपर संडे ठरणार आहे.
भारताकडे न्यूझीलंडच्या मैदानावर पहिल्यांदाच द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात 2008-2009 मध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, ज्यामध्ये भारताला 0-2 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हा तिसरा सामना त्या मैदानात होणार आहे, जिथे भारतीय संघ पहिल्या टी-20 मध्ये अवघ्या 92 धावांवर बाद झाला होता.
हॅमिल्टनच्या मैदानावर भारतीय शिलेदारांना काळजी घ्यावी लागेल. कारण, पहिल्या टी-20 सामन्यातला अनुभव वाईट राहिलेला आहे. त्या वाईट अनुभवातूनच काही तरी शिकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यात ट्रेंट बोल्टच्या नेतृत्त्वातील स्विंग गोलंदाजांनी भारतीय संघाला केवळ 92 धावात बाद करत मोठा विजय मिळवला होता.
भारताची जमेची बाजू म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात 29 चेंडूतच 50 धावा ठोकल्या होत्या. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. तरीही भारताला जुन्या चुकांमधून शिकत हॅमिल्टनच्या मैदानावर न्यूझीलंडचं आव्हान पेलावं लागणार आहे.
भारताने पहिल्या दोन सामन्यात अंतिम अकरामध्ये कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही हेच कॉम्बिनेशन कायम ठेवण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. एखादा बदल केल्यास यजुवेंद्र चहलच्या ऐवजी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. कृणाल पंड्याने गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या सामन्यातही त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल. तर वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांच्याकडे असेल.
भारतीय सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा तर आहेच, पण मधल्या फळीची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण, मागच्या सामन्यात मधल्या फळीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. महेंद्र सिंह धोनी आणि रिषभ पंत यांच्यावर ही जबाबदारी असेल. न्यूझीलंडचे फॉर्मात असलेले फलंदाज भारताविरुद्ध अपयशी ठरत असल्यामुळे हे भारतीय गोलंदाजांचं यश म्हणता येईल. आता ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडही जिंकायचं असेल तर गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही मेहनत घ्यावी लागणार आहे.