बीसीसीआयने आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर 30 मे ला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
14 वा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे. यामध्ये साखळी फेरीतील एकूण 56 सामने पार पडणार आहेत. तर त्यानंतर प्लेऑफमधील 3 तर 1 फायनल अशा एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत.
साखळी फेरीतील एकूण 56 मॅचेस या विविध 6 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुत प्रत्येकी 10-10 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर अहमदाबाद आणि दिल्लीत 8-8 सामने पार पडणार आहेत.
या हंगामात एकूण 11 डबल हेडर्स असणार आहेत. डबल हेडर्स म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. या दिवसातील पहिला सामना दुपारी साडे तीन वाजता, तर दुसरा सामना हा संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल.
यावेळेस अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्येही सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामनाही इथेच पार पडणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे.