विश्वचषक: सेमीफायनलची शर्यत रोमांचक, गुणतालिकेत कोण कुठे?
विश्वचषकासाठी भारताची दावेदारी देखील मजबूत मानली जात आहे. कारण भारताने 3 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला तरी भारत अंतिम 4 संघात सहभागी होईल.
लंडन: विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलची स्पर्धा अंगावर काटा आणणारी ठरत आहे. आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलियाचाच संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. भारताने उर्वरित 3 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकला, तरी भारत सेमीफायनलसाठी अंतिम 4 संघांमध्ये सहभागी होईल. त्यामुळे भारताचीही विश्वचषकावरील दावेदारी मजबूत मानली जात आहे.
सुरुवातीची इंग्लंड संघाची कामगिरी पाहता, इंग्लंडने विश्वचषकावर एकतर्फी सामने जिंकत आपली दावेदारी मजबूत केली होती. मात्र, विश्वचषकाचा पहिला राऊंड पूर्ण होईपर्यंत हे संपूर्ण चित्र पालटले आहे. इंग्लंडवर आता थेट ‘नॉकआउट’ होण्याचीही नामुष्की येऊ शकते. त्यामुळे यापुढील प्रत्येक सामन्याच्या निकालासह गुणतालिकेतील पुढील गणितं कशी बदलू शकतात हे पाहणे मजेशीर असणार आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण |
---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | 7 | 6 | 1 | 12 |
भारत | 6 | 5 | 0 | 11 |
न्युझीलंड | 7 | 5 | 1 | 11 |
इंग्लंड | 7 | 4 | 3 | 8 |
बांग्लादेश | 7 | 3 | 3 | 7 |
पाकिस्तान | 7 | 3 | 3 | 7 |
श्रीलंका | 7 | 2 | 3 | 6 |
दक्षिण आफ्रिका | 8 | 2 | 5 | 5 |
वेस्ट इंडिज | 7 | 1 | 5 | 3 |
अफगाणिस्तान | 7 | 0 | 7 | 0 |
…तर इंग्लंड विश्वचषकातून बाहेर
इंग्लंडचे पहिल्या फेरीतील 2 सामने बाकी आहेत. जर त्यांनी हे दोन्ही सामने जिंकले तर ते थेट अंतिम 4 संघांच्या यादीत सहभागी होतील. मात्र, जर इंग्लंड त्यांचे दोन्ही सामने हरला, तर मग त्यांचा प्रवास खडतर राहिल. कारण पाकिस्तान आणि बांग्लादेश यांनी आपल्या उर्वरित 2-2 सामन्यांपैकी एक जरी सामना जिंकला, तरी इंग्लंड अंतिम 4 मधून बाहेर असेल. दुसऱ्या एका शक्यतेनुसार जर इंग्लंड एक सामना जिंकला तर त्यांचे 10 गुण होतील. अशावेळी पाकिस्तान किंवा बांग्लादेशपैकी कोणत्याही एका संघाने आपले उर्वरित 2 सामने जिंकले तर त्यांचे गुण इंग्लंडपेक्षा अधिक होतील. त्यामुळे इंग्लंड स्वाभाविकपणे विश्वचषकातून बाहेर जाईल. अगदी श्रीलंकेने जरी आपले दोन्ही सामने जिंकले, तरी त्यांचे गुण इंग्लंड इतके होतील. त्यावेळी या दोन संघांच्या धावांची सरासरी निर्णायक ठरेल.
पाकिस्तानही शर्यतीत
पाकिस्तानने आपले उर्वरित 2 सामने जिंकल्यास त्यांचे 11 गुण होतील. दुसरीकडे इंग्लंड 2 पैकी केवळ 1 सामना जिंकल्यास पाकिस्तान पुढील फेरीत सहजपणे पोहचेल. जर पाकिस्तान आणि इंग्लंडने आपले दोन्ही सामने जिंकले आणि न्युझीलंड आपले उर्वरित दोन्ही सामने हरला, तर इंग्लंड आरामात अंतिम 4 मध्ये जागा मिळवू शकेल. अखेर पाकिस्तान आणि न्युझीलंड यांचे गुण एकसमान झाल्यास धावांची सरासरी लक्षात घेऊन तो संघ पुढे जाईल. जर पाकिस्तान आणि बांग्लादेशने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि इंग्लंडचा दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्युझीलंडसोबत पाकिस्तानचा किंवा बांग्लादेशचा संघ देखील असू शकेल.