बाहेर काय चाललंय माहित नाही, पण आज पाकिस्तान आम्हाला सपोर्ट करणार हे नक्की : विराट कोहली
विश्वचषकातील आजच्या (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगलीच फटकेबाजी केली. आज पाकिस्तान संघाचे समर्थक भारताला पाठिंबा देतील, असे मत विराटने व्यक्त केले.
लंडन : विश्वचषकातील आजच्या (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगलीच फटकेबाजी केली. विराटने पाकिस्तानला टोमणा हाणत आज पाकिस्तान संघाचे समर्थक भारताला पाठिंबा देतील, असे म्हटले. तो म्हणाला, “बाहेर काय चाललं आहे, हे मला खरंच माहिती नाही. पण आज पाकिस्तानचे समर्थकही भारताला पाठिंबा देतील. हे खूप दुर्मिळ आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचाच विजय होईल, असाही विश्वास विराटने व्यक्त केला. विराट म्हणाला, “आम्हाला धावांचा पाठलाग करण्यात कधीही अडचण आलेली नाही. मात्र, संधी मिळाल्यास आम्ही फलंदाजीच निवडू. विश्वचषकातील पहिल्या सामन्यानंतर आम्ही लक्ष्याचा पाठलाग केलेला नाही. त्यामुळे ते आमच्यासाठी चांगले आव्हान असेल.”
विराटने विश्वचषकातील आपला विजयरथ सुरु असण्यामागचे रहस्यही सांगितले. आम्ही कधीही विरोधीसंघाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच आम्ही आमच्या कामगिरीत सातत्य राखले, असे विराटने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात भारताने केलेल्या बदलांचीही माहिती विराट कोहलीने यावेळी दिली. तो म्हणाला, “आम्ही आजच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल केला आहे. विजय शंकरला दुखापत झाल्याने त्याच्याजागेवर ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. तो संघात असल्याने आम्ही निर्धास्त आहोत. तो चेंडू सीमारेषेच्या पलिकडे पाठवण्यातही माहिर आहे. एकदा का तो 20 धावांच्या पलिकडे गेला की मग सामना काही वेगळाच असतो.”
संबंधीत बातम्या :
INDvsENG LIVE: इंग्लंडला पहिला धक्का, जडेजाच्या अफलातून झेलमुळे रॉय माघारी
PAK vs AFG : अफगाणिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानचं भविष्य आता भारताच्या हातात
VIDEO : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांचा मैदानाबाहेर तुफान राडा