रुग्णालयात दाखल असलेल्या कांबळीला झालंय तरी काय? आतापर्यंत काय काय झालं?
विनोद कांबळी हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त इतर कारणांमुळे आता विनोद कांबळीची चर्चा होत आहे. खासकरून त्याच्या तब्येतीबाबत बरंच काही सांगितलं जात आहे. असं असताना त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
विनोद कांबळी याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागली आहे. शनिवारी रात्री प्रकृतीच्या कारणास्तव त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृतीबाबत विविध माहिती समोर येत आहे. गेल्या एक दशकापासून क्रिकेटपासून लांब असलेल्या विनोद कांबळीला विविध आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे. विनोद कांबळीने क्रिकेटमधील एक काळ गाजवला आहे. त्यामुळे त्याचा खेळ पाहिलेल्या अनेकांना हळहळ वाटत आहे. एकेकाळच्या हिरोला अशा स्थितीत पाहून मन हेलावत आहे. त्यामुळे विनोद कांबळी गेल्या दहा वर्षात कधी कधी आजारी पडला ते जाणून घेऊयात
विनोद कांबळी कधी कधी आजारी पडला?
विनोद कांबळीने एका मुलाखतीत खुलासा केला की, यूरिनशी निगडीत समस्या जाणवत आहे. याच वर्षी नोव्हेंबरमध्ये या कारणामुळे पडला होता आणि पायावर उभं राहता येत नव्हतं. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. .
गेल्या 12 वर्षात विनोद कांबळीला अनेक मोठ्या आजारांनी ग्रासलं आहे. इतकंच काय तर हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर त्याच्यावर अंजियोप्लास्टी करण्यात आली होती. या उपचारांसाठी मित्र असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदत केली होती.
2013 मध्ये मुंबईत आपल्या कार ड्राईव्ह करताना त्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे गाडी मधेच थांबवली. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा कांबळीला हृदयविकाराचा झटका आला होता. पण त्यातून तो बरा होऊन घरी परतला.
विनोद कांबळी करिअरमधील उतार पाहता डिप्रेशनचा सामना करावा लागला. याचा खुलासा त्याने अनेक वेळा केला आहे. तसेच दारूचं व्यसन लागल्याने आजारी पडला. मागच्या काही वर्षात 14 वेळा रिहॅबिलिटेशनमध्ये जावं लागलं.
या वर्षाच्या ऑगस्टमध्ये विनोद कांबळी पुन्हा एकदा आजारी पडला होता. तेव्हा त्याला चालणंही कठीण झालं होतं. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला पायावर नीट उभंही राहता येत नव्हतं. त्यातूनही तो बरा झाला होता.