पालघर: पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत भारतीय संघातील क्रिकेटर युवराज सिंहचा रेकॉर्ड सर्वांना माहित आहे. मात्र त्यानंतर आता विरारच्या मकरंद पाटीलनेही सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. 89 व्या टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत मकरंदने आपली कामगिरी दाखवली. मकरंद विरारच्या विवा सुपरमार्केट संघातर्फे मैदानात उतरला होता.
विरारच्या विवा सुपरमार्केट संघाने महिंद्रा लॉजिस्टिक्स ली संघावर 78 धावांनी मात करत जेतेपद मिळविले. मकरंद पाटीलने सचिन मयेकरच्या एकाच षटकात मारलेले सहा षटकार हे विवा सुपरमार्केट संघाचे वैशिष्ट्य ठरले. या विजेतेपदाचा मानकरी संघातील एका शेतकऱ्याचा मुलगा मकरंद पाटील हा ठरला आहे. मकरंदने 8 व्या स्थानावर फलंदाजीला येऊन 12 षटकारचा पाऊस पाडत 26 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी केली.
टीम इंडियातील पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, विनायक भोईर, रास्टन डायस या क्रिकेटपटूंनंतर पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने चमकदार खेळी दाखवली. ग्रामीण भागातील तरुणांना जर चांगली संधी मिळाली तर निश्चितच ते आपले नाव उंचावतील असा आशावाद मकरंदच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला.
कोण आहे मकरंद पाटील?
मकरंद पाटील हा 23 वर्षांचा मुलगा विरारच्या अर्नाळा येथील शेतकरी कुटुंबातील आहे. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड आहे. महाविद्यालयात असताना तो साईनाथ क्लबकडून कांगा क्रिकेट खेळत होता. वडील शेतकरी असल्याने मकरंदला नोकरीचीही गरज होती. अशावेळी विवा सुपरमार्केट कंपनीचे संचालक शिखर ठाकूर यांनी त्याला हेरले आणि आपल्या टीममध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली. मागच्या एक वर्षांपासून तो विवा सुपरमार्केट संघात खेळत आहे. शिखर ठाकूर यांनी मकरंदला त्यांच्या कंपनीत सेल्समनचे कामही दिलं. सकाळी आपल्या शेतात काम करतो आणि 10 ते 4 पर्यंत मकरंद सेल्समनचं काम करुन 4 च्यानंतर 6.30 वाजेपर्यंत दररोज विरारच्या जीवदानी मैदानावर क्रिकेटचा सराव करतो. त्याच्या खेळाचा सर्व खर्चही पूर्ण संघ करतो. त्यामुळे त्याला आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली आहे.
8 व्या नंबरवर येऊन 6 चेंडूत 6 सिक्सर, शेतकऱ्याच्या पोराची कमाल!https://t.co/G4CMuSr78o pic.twitter.com/HCT04dnmmF
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019