IndvsNz: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची फलंदाजी पाहून कर्णधार कोहलीलाही पराभव दिसला
भारताने बुधवारी (29 जानेवारी) सेडन पार्क मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं.
IndvsNZ T20 हॅमिल्टन : भारताने बुधवारी (29 जानेवारी) सेडन पार्क मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यालाही काही वेळासाठी आपण सामना हरतो आहोत की काय अशी चिंता वाटली (Virat Kohli on victory against Newzealand). यामागे विराट कोहलीने न्यूझींलडचा कर्णधार केन विलियम्सनची तुफान फलंदाजी असल्याचं सांगितलं.
भारताने 20 षटकांमध्ये 5 विकेट गमावून 179 धावांचं लक्ष्य दिलं. न्यूझीलंडचा संघ देखील विलियम्सनच्या नेतृत्वाखाली या आव्हानाचा तेवढ्याच ताकदीने पाठलाग करत होता. स्वतः विलियम्सनने 95 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयाच्या अगदी जवळ नेलं. मात्र, अखेरच्या 5 चेंडूंमध्ये संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं. अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी एका चेंडूत केवळ एक धाव हवी होती. मात्र, मोहम्मद शमीने अखेरच्या चेंडूवर रॉस टेलरचा बळी घेत सामना फिरवला. अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला एक धाव न काढता आल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे विजयासाठी सुपर ओव्हर खेळली गेली. सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केला.
सामन्यानंतर पुरस्कार वितरणाच्या वेळी कोहली म्हणाला, “केन विलियस्मनने ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि शानदार 95 धावा केल्या ते पाहून एक वेळ तर मलाही वाटलं सामना हरलो आहे. त्यांच्यासाठी वाईट वाटलं, कारण वेळ विरोधात असताना अशी खेळी करुनही पराभव वाट्याला आला तर कसं वाटतं हे मला माहिती आहे.”
अखेरच्या चेंडूवर आम्ही चर्चा करुन स्टम्प्सलाच लक्ष्य करायचं ही रणनीती ठरली होती. कारण असं नाही झालं, तर एक धाव तशीही निघणारच होती, असं विराटने नमूद केलं.
दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल मैदानात उतरले. भारताकडून बुमराहच्या हाती सुपर ओव्हरची धुरा सोपवण्यात आली. मात्र विल्यमस आणि गप्टिलने बुमराहच्या खराब चेंडूचा फायदा घेत फटकेबाजी केली. न्यूझीलंड फलंदाजांनी 1 सिक्सर, 2 चौकारांसह 17 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 18 धावांची गरज होती.
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी जबरदस्त फलंदाजी करुन, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. न्यूझीलंडकडून अनुभवी गोलंदाज टीम साऊदीने सुपर ओव्हर टाकली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. मग के एल राहुलने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन रोहित शर्माकडे स्ट्राईक दिला. त्यावेळी भारताला दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रोहित शर्माने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकून अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा करुन टाकला.
आम्हाला ही मालिका 5-0 ने जिंकायची आहे. त्यामुळे उरलेले दोन्ही सामने आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी इतर खेळाडूंनाही संधी देणं महत्वाचं असेल, असंही कोहलीने सांगितलं.
संबंधित बातम्या:
IndvsNZ T20 : सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माचे 2 षटकार, भारताचा थरारक विजय