भारताची चिंता वाढली, सेमीफायनलपूर्वी विराटवर कारवाईची शक्यता
कर्णधार विराट कोहलीने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणं त्याला महागात पडू शकतं. आयसीसीने विराट कोहलीवर कारवाई केल्यास त्याला सेमीफायनलला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
लंडन : बांग्लादेशवर 28 धावांनी विजय मिळवत भारताने सेमीफायनलमधील आपलं स्थान निश्चित केलं. पण सामना जिंकूनही याच सामन्यामुळे सेमीफायनलपूर्वी आधी भारतासमोर एक नवं संकट उभं राहिलंय. कर्णधार विराट कोहलीने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणं त्याला महागात पडू शकतं. आयसीसीने विराट कोहलीवर कारवाई केल्यास त्याला सेमीफायनलला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
यंदाच्या विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पंचांकडे जास्त अपील मागितल्याने त्याच्यावर काही सामने न खेळण्याची बंदी घातली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पुढील सामना श्रीलंकेसोबत खेळल्यानंतर विराट कोहलीला सेमीफायनलचा सामना खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने मोहम्मद शमीच्या 12 व्या षटकात सौम्य सरकार बाद असल्याचं अपील करत पंचांशी हुज्जत घातली. मैदानावरील पंच मारियास इरास्मस यांनी सौम्य सरकारला नाबाद जाहीर केलं. पण टीम इंडियाने जोरदार अपील करत थर्ड अम्पायरकडून निर्णय मागवला पण, यातही सौम्य सरकार बाद नसल्याचं चित्र स्पष्ट झालं. तरीही विराटने पंचांशी शाब्दि वादावादी केली.
विराट कोहलीच्या याच अपीलमुळे त्याच्यावर सेमीफायनल आधीच बंदी येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. तसं झाल्यास सेमीफायनलचा सामना सुरु होण्याआधीच भारतासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. याआधीही विराटवर अफगाणिस्तान विरोधातील सामन्यात जास्त अपील केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी विराटवर एका सामन्यातील मानधनातील 25 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. आयसीसी आचारसंहिता उल्लंघना अंतर्गत ही कारवाई विराटवर होऊ शकते. विराट विरोधात आयसीसीचे आतापर्यंत दोन डिमेरिट पाईंटस झाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात सेमीफायनलच्या सामन्यात बंदी घातली जाऊ शकते अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.
भारताची लढत सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड किंवा इंग्लंडसोबत होऊ शकते. विराट कोहली भारतीय फलंदाजीमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही. रोहित शर्मानंतर सर्व जबाबदारी ही विराटवर येते. पण विराटला बाहेर बसावं लागल्यास भारतीय संघासाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.