VIDEO : विराट कोहली धोनीसारखा दबाव हाताळू शकत नाही : गौतम गंभीर
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा महेंद्र सिंह धोनीप्रमाणे मैदानात कर्णधारपदाचा दबाव सहन करु शकत नाही असे वक्तव्य माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने केले आहे.
नवी दिल्ली : “टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा महेंद्र सिंह धोनीप्रमाणे मैदानात कर्णधारपदाचा दबाव सहन करु शकत नाही असे वक्तव्य माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने केले आहे.” ‘टीव्ही 9‘ ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत गंभीरने विराट कोहलीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाबाबत आणि जबाबदारीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “विशेष म्हणजे भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज प्रज्ञान ओझानेही विराट ज्या प्रकारे मैदानात आक्रमक होऊन फलंदाजी करतो. मात्र तशाच प्रकारे मैदानात कर्णधारपदाचे नेतृत्व मात्र तो निभावत नाहीत, असे सांगितले.”
विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलच्या विश्लेषणासाठी गौतम गंभीरसह, आर.पी. सिंह, प्रज्ञान ओझा हे दिग्गज टीव्ही 9 च्या न्यूजरुममध्ये आले होते. त्यावेळी त्यांना तुम्हाला विराट कोहली कर्णधार की फलंदाज म्हणून आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी गौतम गंभीरने विराटच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आयपीएलमध्ये विराट कोहलीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या टीमच्या कर्णधार पदाची जबाबदारी दिली जाते. पण आतापर्यंतच्या आयपीएलचा इतिहास पाहता विराटच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.”
विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा टीममध्ये असल्याने विराटला कर्णधार म्हणून जास्त मेहनत करावी लागत नाही. कारण धोनी आणि रोहित दोघेही त्याला फलंदाजी, गोलंदाजीसह, क्षेत्ररक्षणात मदत करतात. पण हेच जेव्हा आयपीएलमध्ये तो एकटा असतो, तेव्हा त्याची मदत करायला त्या ठिकाणी धोनी किंवा रोहित नसतो. यामुळे त्याचे नेतृत्व कमकुवत होते आणि तो बिथरतो. असे गंभीरने उदाहरणासह स्पष्ट केले.
“धोनी आणि कोहलीच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात आकाश-पातळाइतका फरक आहे. कोहलीला धोनीकडून नॉक आऊट सामन्याबाबत शिकायला हवं. कॅप्टन कूल धोनीमुळे या विश्वचषकातीला सामन्यात कोहलीला जास्त मेहनत करावी लागत नाही, असे प्रज्ञान ओझाने सांगितले.”
दरम्यान या दोघांनीही विराटच्या कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी त्यांनी विराटच्या फलंदाजीचे मात्र तोंड भरुन कौतुक केले आहे. यंदाच्या विश्वचषकात विराटने पाच अर्धशतकं केली आहेत. पण त्याला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. विराटचा कोणताही सामना टीमच्या बाजूने फिरवू शकतो.
आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. भारतानं सात सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवलं आहे. मात्र आता उपांत्य फेरीत भारताचा बलाढ्य न्यूझीलंडशी मुकाबला होत आहे.