40 व्या वर्षीही वासिम जाफर थकेना, 57 वं शतक झळकावलं!
नागपूर: दिग्गज, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि दीर्घ अनुभव असलेला भारताचा फलंदाज वासिम जाफर 40 व्या वर्षीही नवनव्या विक्रमांचे इमले रचत आहे. रणजी चषक स्पर्धेत विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात नाबाद शतक ठोकलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जाफरचं हे तब्बल 57 वं शतक आहे. वासिम जाफर नाबाद 111 आणि संजय रामास्वामी नाबाद 112 धावांच्या जोरावर […]
नागपूर: दिग्गज, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि दीर्घ अनुभव असलेला भारताचा फलंदाज वासिम जाफर 40 व्या वर्षीही नवनव्या विक्रमांचे इमले रचत आहे. रणजी चषक स्पर्धेत विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात नाबाद शतक ठोकलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जाफरचं हे तब्बल 57 वं शतक आहे. वासिम जाफर नाबाद 111 आणि संजय रामास्वामी नाबाद 112 धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर विदर्भ संघाने 1 बाद 260 अशी मजबूत मजल मारली आहे. या सामन्यात उत्तराखंड संघाने सौरभ रावतच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 355 धावा केल्या आहेत.
यानंतर फलंदाजीस उतरलेल्या गतविजेत्या विदर्भ संघाने दमदार फलंदाजी केली. कर्णधार फैज फजल 29 धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर रामास्वामी आणि वासिम जाफरने टिच्चून फलंदाजी केली. या दोघांना आऊट करणं उत्तराखंडच्या गोलंदाजांना दिवसभरात जमलं नाही. दोघांनीही शतकं ठोकली. या शतकांमध्ये वासिम जाफरचं शतक खास आहे. कारण वयाची चाळीशी पूर्ण केलेल्या वासिम जाफरने या वयातही आपण तगडा फलंदाज असल्याचं दाखवून दिलं.
वासिम जाफरचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे 57 वं शतक आहे. वासिम जाफर रणजी चषकात विविध संघांकडून खेळला आहे. यापूर्वी त्याने मुंबईचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर तो विदर्भकडून खेळत आहे. जाफरने 250 प्रथम श्रेणी सामन्यात तब्बल 18873 धावांचा रतीब घातला आहे.
Wasim Jaffer 111 batting for Vidarbha v Uttarakhand @ Nagpur #RanjiTrophy 2018/19 QF Now has 57 first-class 100s 36 for Mumbai 7 for W Zone 6 for Vidarbha 5 for India 1 for India A/Rest of India/Elite GroupB as a teenager: 3 100s (HS: 311) as a 40+ veteran: 5 100s (HS: 286)
— Mohandas Menon (@mohanstatsman) January 16, 2019
वासिम जाफरची शतकं
- मुंबईकडून खेळताना – 36
- पश्चिम विभागाकडून खेळताना – 7
- विदर्भकडून खेळताना – 6
- भारताकडून खेळताना – 5
- इंडिया A -1