मुंबई : आयसीसी वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात 6 गडी गमवून 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारतानं 4 विकेट गमवून 18 षटकं 1 चेंडूत पूर्ण केलं. भारताकडून दीप्ती शर्मानं 4 षटकात 15 धावा देऊन तीन गडी बाद केले. तर रेणुका शर्मा, पूजा वस्त्राकार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतानं या विजयासह 4 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची वाट आणखी सोपी झाली आहे. भारताचा पुढचा सामना आयर्लंड आणि इंग्लंडसोबत असणार आहे. त्यामुळे भारताने आणखी दोन सामने जिंकले की थेट उपांत्य फेरीत धडक मारणार आहे.
“आमच्यासाठी चांगला दिवस होता.आम्हाला जे अपेक्षित होते ते आम्ही करू शकलो. दीप्तीवर आम्ही टीम मीटिंगमध्ये याबद्दल चर्चा केली.गोलंदाजी प्रशिक्षकाने तिला मदत केली.ऋचा घोष अशी व्यक्ती आहे जी नेहमी आमच्यासाठी विजय खेचून आणते. ती खूप आक्रमक बॅटर आहे.आम्ही निकालावर खूश आहोत आणि पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे.फक्त लय सुरू ठेवायची आहे.”, असं भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.
वेस्ट इंडिजनं 119 धावांचं दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना जोडी मैदानात आली. या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली.त्यानंतर करिश्मा रामहराकच्या गोलंदाजीवर मंधाना स्टंपिंग झाली आणि 10 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर पाचव्या षटकात जेमिमा रॉड्रिग्स अवघी 1 धाव करून बाद झाली. त्यानंतर शफाली वर्मा करिश्मा रामहराकच्या गोलंदाजीवर झेल बाद झाली. तिने 23 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि रिचा घोषनं संघाचा डाव सावरला आणि विजयी धावांपर्यंत नेलं. शेवटी विजयासाठी अवघ्या 4 धावा आवश्यक असताना हरमनप्रीत झेलबाद झाली. रिचा घोषनं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिचाने 32 चेंडूत 44 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंह.
विडिंज प्लेइंग इलेव्हन : हेले मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरॅक आणि शकीरा सेलमॅन.