केएल राहुलला नेमकं काय झालं आहे ? सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं की…
केएल राहुलला काही केल्या फॉर्म गवसत नाही. त्यामुळे त्याच्यावर आता टीकेची झोड उठत आहे. वारंवार संधी दिली जात असल्याने आता माजी खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. असं असताना केएल राहुलच्या त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही सामन्यांपासून केएल राहुल सतत अपयशी ठरत आहे. मागच्या दोन कसोटी सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे केएल राहुल टीकाकारांच्या रडारवर आला आहे. इतकंच वेंकटेश प्रसादसह माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. उपकर्णधार पदावरून गच्छंती केलेला केएल राहुल मागच्या 10 कसोटी डावात 25 आकडाही गाठू शकलेला नाही.त्याने 47 कसोटी सामन्यात 35 पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या आहेत त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल ऐवजी शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आता भारताची माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने केएल राहुलवर आपलं मत मांडलं आहे. सौरव गांगुलीने सांगितलं की, “भारतात एखादा खेळाडू जर सुमार कामगिरी करत असेल तर त्याला टीका सहन करावीच लागेल.” केएल राहुलसोबत नेमकं असं का होत आहे? याबाबतही सौरव गांगुली याने पुढे सांगितलं.
सौरव गांगुलीने काय सांगितलं?
सौरव गांगुलीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “राहुलला मानसिक आणि तांत्रिक या दोन्ही स्तरावर त्रास होत आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये चांगली खेळी केली आहे. पण लोकं राहुल सारख्या खेळाडूकडून अधिक आशा बाळगतात. त्याने 9 वर्षात फक्त पाच शतकं केली आहेत. राहुलने चांगलं प्रदर्शन केलं आहे. पण भारतासाठी खेळणाऱ्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजाकडून जरा जास्तच आशा असतात. कारण दुसऱ्या सलामीच्या खेळाडूंनी स्टँडर्ड वाढवला आहे.”
“जेव्हा तुम्ही खेळात अयशस्वी होता तेव्हा तुमच्या टीका होणारच आहे. मला माहिती आहे की, राहुलमध्ये क्षमता आहे. पण जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्याने धावा करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.”
तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदौर येथे खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडने दुसऱ्या कसोटीनंतर केएल राहुलला पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पण त्याला टीम मॅनेजमेंटने बाहेर बसवलं तर रोहित शर्मासोबत ओपनिंगाल शुभमन गिल येण्याची शक्यता आहे. पण सूर्यकुमार यादव यालाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुभमन गिल सध्या सर्वोच्च फॉर्मात आहे. मागच्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने दोन शतकं ठोकली आहेत. वनडे आणि टी 20 मध्ये प्रत्येकी एक शतक केलं आहे. न्यूझीलँडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 208 धावांची खेळी केली होती. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये शुभमन गिलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.