नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणाच्या झालेल्या हत्ये प्रकरणी (Sagar Rana Murder) मुख्य आरोपी, ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला (Sushil Kumar) अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुशील कुमार आपल्या साथीदारांसह सागर राणाला मारहाण करत असल्याचे व्हिडीओ क्लीप्स ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली होती. सुशील कुमारने स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. (What will happen to Wrestler Sushil Kumar Olympic Medals if convicted in Sagar Rana Murder Case)
सागर राणाच्या हत्येमागील नेमकं कारण काय?
सागर राणा हत्येच्या कटाविषयी माहिती मिळवण्यासाठी सुशील कुमारची चौकशी करायची आहे, असं पोलिसांनी सुशीलच्या कोठडीची मागणी करताना कोर्टाला सांगितलं. या प्रकरणातील अन्य आरोपींचा काय सहभाग होता, हेही पोलिसांना जाणून घ्यायचं आहे. 4 आणि 5 मेच्या रात्रीनंतर सुशील कुमार फरार झाला. सुशीलविरोधात लूक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतरही तो पोलिसांसमोर हजर झाला नाही. अटक होईपर्यंत 18 दिवसांच्या काळात तो कुठे लपला, त्याला कोणी कोणी मदत केली, याची माहितीही पोलिसांना करुन घ्यायची आहे.
छत्रसाल स्टेडियममध्ये, जिथे सागर राणाची हत्या झाली, तिथल्या सीसीटीव्ही फूटेजचे डीव्हीआर सुशील कुमार घेऊन पसार झाला होता. हे डीव्हीआर पोलिसांना ताब्यात घ्यायचे आहेत. सुशीलला घेऊन दिल्लीबाहेर जाण्याची गरज पडू शकते. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संबंधी नियमांचं पालन करुन तपास करताना वेळ लागू शकतो, असंही पोलिसांचं म्हणणं आहे.
सुशीलच्या वकिलांचं म्हणणं काय?
दरम्यान, सुशील कुमारकडे ना दांडुका सापडला ना कुठले हत्यार, तो पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत खेळाडू आहे. अशा परिस्थितीत पोलीस त्याला कोठडीत ठेवून काय मिळवू पाहत आहेत, असा सवाल सुशील कुमारच्या वकिलांनी विचारला.
सुशील कुमारच्या ऑलिम्पिक पदकांचं काय होणार?
सुशील कुमारवर हत्येचा आरोप सिद्ध झाला, तरी त्याच्या ऑलिम्पिक पदकाला कोणताही फटका बसणार नाही. त्याची पदके त्याच्याकडेच राहतील. जगभरात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत जिथे ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी भयंकर गुन्हे केले आहेत, परंतु त्यांची पदकं हिसकावलेली नाहीत. ऑलिम्पिकशी संबंधित Olympedia.org या वेबसाईटच्या मते, गेल्या काही वर्षांत 33 ऑलिम्पिक पदक विजेते तुरुंगात गेले आहेत. त्यापैकी बरेच जण खून, लैंगिक अत्याचार किंवा मानवी तस्करी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतले होते. परंतु शिक्षा भोगल्यानंतर आणि तुरुंगात रवानगी झाल्यानंतरही ते ऑलिम्पिक पदक विजेतेच राहत. (Sushil Kumar Olympic Medals)
कोण आहे सुशील कुमार?
सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.
मोबाईल ट्रेस करुन सुशीलला बेड्या
दिल्लीच्या सीमेजवळ सुशीलसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सुशीलविरोधात लूक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती. अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर दिल्लीच्या मॉडेल टाऊन एसीपींच्या नेतृत्वात दोन पोलीस निरीक्षक आणि डझनभर पोलीस कर्मचारी त्याच्या शोधात पंजाबला गेले होते. अखेर मोबाईल ट्रेस करुन सुशील आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीच्या सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं.
सुशील कुमारने आपल्या साथीदारांसोबत 4 मे रोजी रात्री पैलवान सागर राणा उर्फ सागर धनखडसह तिघा जणांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, त्यामध्ये 23 वर्षीय सागरचा मृत्यू झाला. सागरचे पिता अशोक धनखड दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत. सागर छत्रसाल स्टेडियममध्येच राहत होता. तो सुशीलकुमारचा शिष्य होता. प्रशिक्षण काळात सागरने अनेक पदकंही जिंकली.
संबंधित बातम्या :
Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला
पैलवान सुशील कुमारच्या शोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस, सागर राणा मृत्यू प्रकरणात नाव
(What will happen to Wrestler Sushil Kumar Olympic Medals if convicted in Sagar Rana Murder Case)