IPL 2023 : महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून कधी निवृत्त होणार? रोहित शर्मा याने केला मोठा खुलासा
भारतीय क्रिकेट इतिहासात महेंद्रसिंह धोनी सर्वात उत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्यामुळे धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आता आयपीएलमध्येच खेळत आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्र सिंह धोनीची जोरदार चर्चा रंगली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून सर्व पर्वात महेंद्रसिंह धोनी खेळला आहे. 2008 ते 2015 या काळात धोनी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. चेन्नई संघावर दोन वर्षांची बंदी लागल्याने 2016 ते 2017 या दोन पर्वात रायझिंग पुणे सुपरजायन्ट संघाकडून खेळला. त्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या हाती आली. महेंद्र सिंह धोनीचं हे 16 वं पर्व आहे. त्यात धोनीचं वय 41 वर्षे असून 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यानंतर आतापर्यंत धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे.
महेंद्रसिंह धोनीने चेन्नईला चारवेळा जेतेपद पटकावून दिलं आहे. तसेच सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा मान देखील धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीचं आयपीएलमधील हे शेवटचं पर्व असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला विचारलं असता त्याने धोनीच्या निवृत्तीबाबत स्पष्टच सांगितलं.
“मी असं मागच्या कित्येक आयपीएल सिझनमध्ये ऐकलं आहे. धोनीची शेवटची आयपीएल आहे की नाही हे मला माहिती नाही. मी याबाबत गेल्या दोन तीन वर्षांपासून ऐकत आहे. तो एकदम फीट आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळू शकतो.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनी याने सुद्धा आतापर्यंत निवृत्तीबाबत कोणतंच भाष्य केलेलं नाही. 2021 मध्ये महेंद्रसिंह धोनीने सांगितलं होतं की, शेवटचा आयपीएल सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळणार आहे. यावेळी चेन्नई आपला पहिला सामना चेपॉकवर खेळणार आहे. त्यामुळे निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्स
चेन्नई सुपरकिंग्सची सर्वोत्तम Playing XI: ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दुबे, दीपक चाहर, सिमरजीत सिंह आणि महीश तीक्षणा.
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.