धवन बाहेर, भुवीला दुखापत, आता विजय शंकरनेही चिंता वाढवली
विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. याचवेळी गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर चेंडू त्याच्या पायावर लागला.
लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडिया शानदार फॉर्मात आहे. पण भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. सलामीवीर फलंदाज शिखर धवन उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतग्रस्त झालाय. त्यातच चिंता वाढवणारी बाब म्हणजे अष्टपैलू खेळाडू विजय शंकरच्या पायालाही दुखापत झाली आहे. ही दुखापत किती चिंताजनक आहे याबाबत अजून संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी चिंता मात्र वाढली आहे.
विजय शंकर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. याचवेळी गोलंदाज जसप्रीत बुमराचा यॉर्कर चेंडू त्याच्या पायावर लागला. यानंतर विजय शंकरला प्रचंड वेदना झाल्या आणि तो माघारी परतला. दरम्यान, पीटीआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुखापत फार गंभीर नाही.
भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवीच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही. पुढचे आठ दिवस तो खेळू शकणार नाही. विजय शंकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. या सामन्यात पहिलीच विकेट विजय शंकरने मिळवून दिली होती. त्यामुळेच त्याच्या दुखापतीविषयी चिंता वाढली आहे.
भारतीय संघाचा पुढील सामना 22 तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलाय. तर भुवीवर फिजिओंच्या देखरेखीत आहे. विजय शंकरला दुखापतीमुळे सरावही करता आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे.
भारताचे पुढील सामने
भारत वि. अफगाणिस्तान, 23 जून
भारत वि. वेस्ट इंडिज, 27 जून
भारत वि. इंग्लंड, 30 जून
भारत वि. बांगलादेश, 02 जुलै
भारत वि. श्रीलंका, 06 जुलै