भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता होताना पाहायचंय : शोएब अख्तर
न्यझीलंडला दबावात खेळता येत नाही आणि त्यामुळे ते जिंकणार नाहीत. खरं सांगायचं तर विश्वचषक आपल्या खंडात यावा आणि त्यामुळेच मी भारताला पाठिंबा देतोय, असं तो म्हणाला.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विश्वचषकातील सेमीफायनलपूर्वी भारताला पाठिंबा जाहीर केलाय. हा विश्वचषक आशिया खंडात यावा यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं तो म्हणाला. न्यझीलंडला दबावात खेळता येत नाही आणि त्यामुळे ते जिंकणार नाहीत. खरं सांगायचं तर विश्वचषक आपल्या खंडात यावा आणि त्यामुळेच मी भारताला पाठिंबा देतोय, असं तो म्हणाला.
शोएब अख्तरने सलामीवीर रोहित शर्माच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. रोहित शर्माची टायमिंग आणि शॉट निवड जबरदस्त आहे. खेळाविषयी त्याची समज ही अतुलनीय आहे. लोकेश राहुलनेही शतक ठोकलं, जी भारताच्या दृष्टीने आणखी चांगली गोष्ट आहे, असं म्हणत शोएब अख्तरने भारतीय सलामीवीर जोडीचं महत्त्व सांगितलं.
“भारतीय कुणाला तिकीट देत नाहीत”
भारत विरुद्ध न्यूझीलंड या पहिल्या सेमीफायनलचे सर्व तिकिटं दोन दिवस अगोदरच बूक झाले आहेत. यावरही शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिला. यावर तो म्हणाला, भारतीय सर्व तिकिटं अगोदरच खरेदी करतात, ज्यामुळे कुणालाही तिकीट मिळत नाही. भारतीय चाहते कुणाला तिकीट मिळू देत नाहीत, असं तो म्हणाला.
… तर भारत थेट फायनलमध्ये
यंदाच्या विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सेमीफायनल सामना उद्या (9 जुलै) होणार आहे. इंग्लंडच्या मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात न्यूझीलंड एकमेव असा संघ आहे, ज्यासोबत भारताचा सामना झाला नाही. याआधीही पावसामुळे या दोन संघांमधला सामना रद्द झाला होता. उद्या फायनलसाठी होणाऱ्या लढतीतही पावसाने खोडा घातला तर काय होईल असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
मात्र टेन्शन घेऊ नका, कारण उद्या होणार सामना पावसामुळे रद्द झाला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (10 जुलै) खेळवण्यात येईल. पण जर 10 तारखेलाही पाऊस झाला. तर मात्र आयसीसीच्या नियमाप्रमाणे दोन्ही टीमला नियमाप्रमाणे प्रत्येकी एक-एक गुण दिले जातील. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात एक वाढीव गुण मिळेल आणि भारत 16 गुणांवर पोहोचेल. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडे 11 गुण असल्याने त्यांचा 1 गुण वाढून एकूण गुणसंख्या 12 वर पोहोचेल. म्हणजेच जरी हा सामना रद्द झाला, तरी टीम इंडियाला याचा फायदा होईल.