मुंबई : भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु असतानाच हा निकाल लागला आहे. कारण न्यूझीलँडने श्रीलंकेचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. त्याचा थेट फायदा भारताला झाला आणि अंतिम फेरीचं गणित सुटलं. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काहीही करून चार सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकायची होती. पण चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या चिवट खेळीने सर्व गणित फिस्कटलं. मात्र न्यूझीलँडच्या खेळीने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे.
श्रीलंकेला न्यूझीलँडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका काहीही करून 2-0 ने जिंकायची होती. मात्र पहिल्याच सामन्यात किवीने श्रीलंकेचा पराभव केला. त्यामुळे श्रीलंकेची आयसीसी गुणतालिकेत घसरण झाली आणि भारतानं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.
India have qualified for the World Test Championship final!
They'll take on Australia at The Oval for the #WTC23 mace!
More: https://t.co/75Ojgct97X pic.twitter.com/ghOOL4oVZB
— ICC (@ICC) March 13, 2023
न्यूझीलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिले दोन दिवस गाजवले. पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद 355 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलँडने सर्वबाद 373 धावा केल्या आणि 18 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात श्रीलंकेला 302 धावांवर रोखण्यात न्यूझीलँडला यश आलं. तसेच विजयासाठी 286 धावांचं आव्हान मिळालं. शेवटच्या दिवशी शेवटच्या न्यूझालँड 2 गडी राखून विजय मिळवला. केन विलियमसननं नाबाद 121 धावांची खेळी केली. असं असलं तरी शेवटच्या षटकापर्यंत श्रीलंकेनं न्यूझीलँडला विजयासाठी झुंजवलं तितकंच खरं आहे.
New Zealand scurry to a famous Test win running a bye off the final ball!
Sri Lanka's push for a spot in the #WTC23 final falls agonisingly short!#NZvSL Scorecard: https://t.co/p873rNARKS pic.twitter.com/CnFWN8xBti
— ICC (@ICC) March 13, 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात असणार आहे. सामन्यात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास आयसीसीने एक दिवस राखून ठेवला आहे. म्हणजेच 12 जून हा दिवस राखीव असेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलँड या दोन संघात रंगला होता. न्यूझीलँडने 8 गडी राखून भारतावर विजय मिळवला होता. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 217 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युरात न्यूझीलँडने सर्वबाद 249 धावांची खेळी केली. न्यूझीलँडकडे पहिल्या डावात 32 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं न्यूझीलँडने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं.