मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतानं दुसऱ्यांदा धडक मारली आहे. न्यूझीलँडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला आणि भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना रंगणार आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्व कसोटी मालिका संपलेल्या आहेत. त्यामुळे भारत थेट अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणात कोणता खेळाडू तग धरून खेळेल याची चाचपणी आतापासून केली जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनुभवी आणि इंग्लंडमध्ये तग धरणाऱ्या खेळाडूंचा विचार केला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत या मालिकेतील खेळणाऱ्या काही खेळाडूंना डच्चू मिळेल. तर काही खेळाडूंना या संघात स्थान मिळू शकते.
केएल राहुल आणि केएस भारतला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळणं कठीण आहे. कारण दोघांनाही फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नाही. केएल राहुलला तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. ऋषभ पंतला जबर दुखापत झाल्याने तो काही 86 दिवसात फीट होईल असं चित्र नाही.
श्रेय्यस अय्यरही पाठीच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शुभमन गिलचा फॉर्म पाहता त्याला संघात स्थान मिळेल. तसेच अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यरच्या जागी पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचा देखील विचार केला जाऊ शकतो.
दुसरीकडे, जसप्रीत बुमराह कमबॅक करेल अशी तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे हा पर्याय देखील उरणार नाही. त्यामुळे उमेश यादवचं संघातील स्थान निश्चित आहे, असंच म्हणावं लागेल. त्यात बीसीसीआयने अष्टपैलू हार्दिक पांड्याशी कसोटीत खेळण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.
त्यात वेगवान गोलंदाजीचं वर्चस्व इंग्लंडमध्ये असल्या कारणाने हर्षल पटेल आणि दीपक चाहर याचा विचार केला जाऊ शकतो. दोघंही गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करतात. बीसीसीआय यावेळी खेळाडू निवडताना काळजी घेत आहे. त्यासाठी आतापासूनच चाचपणी सुरु आहे.
संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर/सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल मैदानात असणार आहे. सामन्यात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास आयसीसीने एक दिवस राखून ठेवला आहे. म्हणजेच 12 जून हा दिवस राखीव असेल.