पैलवान बजरंग पुनिया ज्येष्ठ कुस्तीपटू महावीर फोगाट यांचा जावई होणार
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया महावीर फोगाट यांची कन्या संगीतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे

मुंबई : पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia) प्रख्यात कुस्तीपटू महावीर फोगाट (Mahavir Phogat) यांचा जावई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. गीता-बबिता यांची सर्वात धाकटी बहीण संगीता फोगाट (Sangeeta Phogat) बजरंगसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
25 वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.
21 वर्षांची संगीता ही महावीर फोगाट यांची सर्वात धाकटी कन्या आहे. फोगाट आणि पुनिया कुटुंबाचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. ‘लग्नाबाबत अद्याप कोणतीही बोलणी झालेली नाही. मी माझ्या मुलींना पूर्ण मोकळीक दिली आहे. लग्नाचा निर्णय मी सर्वस्वी त्यांच्यावर सोडला आहे.’ असं महावीर फोगाट म्हणाले.
बजरंग पुनियाच्या वडिलांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. बजरंगच्या लग्नाबाबत कोणाशीही बोलणी झालेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. बजरंग पूर्णपणे टोक्यो ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करत आहे. सध्या लग्नाचा विषय घरात नाही, असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. संगीताचा चुलत भाऊ राहुल फोगाटनेही या लग्नाच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
महावीर फोगाट यांची सर्वात मोठी कन्या गीता फोगाटने 2016 मध्ये बॉयफ्रेण्ड पवनकुमार सोबत विवाह केला. तर दुसरी कन्या बबिता फोगाट लवकरच कुस्तीपटू विवेक सुहागसोबत बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनेही वडिलांनी आपल्या लग्नाला पसंती दिल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं.