WTC Final साठी या खेळाडूचा टीम इंडियात समावेश करणार, बीसीसीआयची मोठी ‘खेळी’
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. तिथलं वातावरण पाहता बीसीसीने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अंतिम फेरीसाठी या खेळाडूचा विचार केला जात आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित आता शेवटच्या टप्प्यात चौथा कसोटीनंतर अंतिम फेरीबाबत चित्र स्पष्ट होईल. भारताने चौथा कसोटी सामना गमवला तरी भारताला संधी मिळू शकते. असं असताना अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याचा विचार केला जात आहे. सध्या हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचं कर्णधारपद आहे. असं असताना हार्दिकने शेवटचा कसोटी सामना 20 सप्टेंबर 2012 रोजी खेळला होता. त्यानंतर पाठिच्या दुखापतीमुळे पांड्या कसोटी संघात परतलाच नाही. मात्र आता पूर्णपणे फिट असल्याने त्याचा विचार केला जात आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने त्याच्या भविष्यातील रणनितीबाबत स्पष्टता मागितली आहे. कसोटी खेळणार की नाही याबाबत त्याला विचारणा केली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी हा निर्णय अपेक्षित आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलं की, “हार्दिकला कसोटी पुनरागमनाची घाई नाही. पण याबाबत स्पष्टता असणं गरजेचं आहे.”
“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आम्ही याबाबत चर्चा करत आहोत. बुमराह टीमच्या बाहेर आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षा आहेत. इंग्लंडमध्ये तो चांगल्या प्रकारे खेळू शकतो. पण आम्ही त्याच्यावर याबाबत दबाव टाकणारन नाही.”, असंही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं.
“सध्या तो कसोटीसाठी उपलब्ध नाही. दुखापतीमुळे तो त्रस्त आहे. त्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं कठीण होईल. एनसीएची वैद्यकीय टीम आणि हार्दिक पांड्याला वाटत असेल टेस्ट खेळावी, तर तो नक्कीच मैदानात असेल.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
हार्दिक पांड्याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटबाबत एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, “जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा कसोटी पुनरागमन करेल. सध्या मी व्हाईल बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर माझ्या शरीराने साथ दिली तर नक्कीच कसोटीत खेळेन.”
हार्दिक पांड्याची क्रिकेट कारकिर्द
हार्दिक पांड्या सध्या टी 20 संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्स प्रतिनिधीत्व करत आहे. हार्दिक आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळला आहे. त्यात 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 11 गडी देखील बाद केले आहेत.
हार्दिक पांड्या 71 वनडे खेळला असून यात 31.73 च्या सरासरीने 1518 धावा केल्या आहेत. तर 68 गडी बाद केले आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये 87 सामन्यात 25.42 च्या सरासरीने 894 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 69 गडी बाद केले आहेत.