Reliance Jio GigaFiber : किंमत, पॅकेज आणि सर्व काही…
येत्या 5 सप्टेंबरला रिलायन्स जिओ गिगा फायबर उपलब्ध करण्यात येणार आहे. जिओ गीगाफायबरमुळे युजर्सला हाय स्पीड इंटरनेट अन्य सुविधा मिळणार आहे.
मुंबई : रिलायन्सच्या महत्त्वाकांक्षी ब्रॉडबँड सर्विसबाबत जिओ गिगा फायबरची (Jio Gigafiber) प्रतीक्षा अखेर संपली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या 42 व्या सर्वसाधारण सभेत याबाबतची महत्त्वपूर्ण घोषणा केली. येत्या 5 सप्टेंबरला रिलायन्स जिओ गिगा फायबर (Reliance Jio GigaFiber) उपलब्ध करण्यात येणार आहे. जिओ गिगाफायबरमुळे युजर्सला हाय स्पीड इंटरनेट अन्य सुविधा मिळणार आहे. यासोबतच कंपनीने जिओ फोन 3, जिओ सेट टॉप बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही याबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
जिओ गिगाफायबरची किंमत
जिओ गिगाफायबरची सुरुवात 700 रुपयांपासून होणार आहे. जिओ गिगाफायबरच्या सर्वात कमी किमतीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 100 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तर सर्वात महागडा प्लॅन हा 10 हजार रुपयांचा असेल. जिओ गिगाफायबरच्या किमतीत कंपनी ग्राहकांना वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. जिओ गीगाफायबरच्या प्रिमियम प्लॅनचा स्पीड 1 जीबीपीएस इतका असेल.
कॉलिंग फ्री
जिओ गिगाफायबरमुळे ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटबरोबरच कॉलिंग बेनिफिटही मिळणार आहे. गिगाफायबर असलेल्या ग्राहकांना फक्त डेटाचे पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे जिओ गीगाफायबरचे वार्षिक पॅकेज घेणाऱ्या ग्राहकांना HD/4K एलईडी टेलीव्हिजन सेट आणि 4K सेटअप बॉक्स मोफत मिळणार आहेत.
“फर्स्ट डे फर्स्ट शो”
गिगाफायबरवर अनेक नवीन चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. याला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा 2020 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना घरात बसल्यानंतरही चित्रपटगृहात बसल्याचा आनंद घेता यावा यासाठी कंपनीने मिक्स्ड रिअॅलिट डिवाईस लाँच केले आहे.
अनेकदा कपडे ऑनलाईन खरेदी करताना आपला मापाचा अंदाज चुकतो. ग्राहकांचा हा त्रास दूर करण्यासाठी रिलायन्सने मिक्स्ड रिअॅलिटी डिवाईस लाँच केले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन कपडे परिधान करुन ते तुम्हाला योग्य आहेत का याचा अंदाज येईल.
इंटरनॅशनल कॉलिंग स्वस्त
जिओ गीगाफायबरसोबत अनेक ओटीटी अॅप्लिकेशन सबस्क्रिपशन मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम यासारख्या सेवांचा तुम्हाला मोफत लाभ घेता येणार आहे. यासोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय काँलिंगसाठी एक नवा प्लॅन लाँच केला आहे. यात केवळ 500 रुपयात तुम्हाला अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.
तसेच जिओ आपल्या ग्राहकांना एक सेटटॉप बॉक्सही देणार आहे. याद्वारे युजर्स चार जणांसोबत एकावेळी व्हिडीओ कॉनफर्न्सद्वारे बोलू शकणार आहे. त्याशिवाय या सेटटॉप बॉक्समध्ये विविध गेम्सही दिले जाणार असून तुम्ही ऑनलाईन उपलब्ध असणारे गेम्स खेळता येणार आहेत. तसेच यात मल्टीप्लेअर गेमिंग सपोर्टही दिला जाणार आहे. यासोबत ग्राहकांना सिम सेटअपसोबत फोन अपग्रेडचीही सुविधा दिली जाणार आहे. तसेच फॅमिली प्लॅन्सवरही विविध ऑफर देण्यात येणार आहे.
जिओ गिगाफायबर म्हणजे काय?
गिगा फायबर ही एक ब्रॉडबँड सेवा आहे. यामुळे युजर्सला हाय स्पीड इंटरनेट, जिओ टी.व्ही सारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षापासून देशभरात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु केली होती. त्यावेळी 5 लाख घरांमध्ये या सेवेचा वापर केला जात होता. दरम्यान ही चाचणी यशस्वीरित्या झाली असल्याचं मुकेश अंबानींनी याआधीच स्पष्ट केलं होतं.