Airtel च्या ग्राहकांना झटका, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सर्व प्लॅनच्या किमतीत वाढ
भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीत (Airtel recharge price hike) वाढ करत आहे.
मुंबई : भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीत (Airtel recharge price hike) वाढ करत आहे. एअरटेलने दुसऱ्यांदा आपल्या मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ (Airtel recharge price hike) केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
कंपनीने आपल्या सर्व बेस रिचार्जच्या किंमती बदलून नवी किंमत आजपासून लागू केली आहे. जर तुम्हाला एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असेल तर तुम्हाला किमान 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे.
यापूर्वी हा रिचार्ज 35 रुपयांचा होता. याचा अर्थ आता ग्राहकाला दहा रुपये अधिक मोजावे लागणार आहे.
ग्राहकांना जर कॉलिंग करायची असेल तर त्यांना कमीत कमी 1.50 रुपये प्रति मिनिट द्यावे लागणार. याचा अर्थ 2.5 पैसे प्रति सेकंद द्यावे लागणार. त्यासोबतच एअरटेलने SMS चे दरही वाढवले आहेत. ग्राहकाला आता SMS साठी 1 रुपये आणि STD SMS साठी 1.50 रुपये द्यावे लागणार आहे.
यापूर्वी 4 डिसेंबर रोजी टेलिकॉम कंपनीने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत 40 टक्क्यांची वाढ केली होती. आता दुसऱ्यांदा एअरटेलने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे.