गंडा घालण्यासाठी असा पण बनाव, तुम्हाला पण आला का हा कॉल
Fraud Calls | अनेक मोबाईलधारकांना अनोळखी क्रमांकावरुन कॉल येत आहेत. स्काईप व्हिडिओ कॉल जॉईन करण्यासाठी सांगितले जाते. हा सर्वसामान्यांना गंडविण्याचाच एक प्रकार असल्याचे समोर आले आहे. कशी करतात फसवणूक, कसा घातला जातो सर्वसामान्यांना गंडा, काय आहे हा प्रकार, घ्या जाणून...
नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : देशातील मोबाईलधारकांना फसविण्याचा नवीन प्रकार नुकताच समोर आला आहे. केंद्र सरकारनेच याविषयी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. देशातील काही नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन तर करावाचा लागला. पण त्यांना गंडवल्या गेल्याचे पण काही प्रकरणात समोर आले आहे. मोबाईलधारकांना अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. त्यामध्ये कॉल करणारा स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा(TRAI) कर्मचारी असल्याचा दावा करतो. त्यानंतर विविध आमिषं दाखवून अथवा धमकी देऊन मोबाईलधारकाला लुटल्याचे समोर आले आहे.
TRAI चे स्पष्टीकरण
TRAI ने याविषयीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, त्यांचा कोणताही कर्मचारी, अधिकारी अशा प्रकारचा कॉल करत नाही. या कॉलमध्ये मोबाईलधारकांना त्यांचा क्रमांक बंद करण्याची धमकी देण्यात येते. बिल वेळेवर भरले नाही अथवा इतर कारणे त्यासाठी देण्यात येतात. पण हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे.
ट्रायने ट्विटरवर दिली माहिती
TRAI ने एक्स प्लॅटफॉर्मवर(पूर्वीचे ट्विटर) याविषयीची माहिती दिली. त्यासाठी एक प्रेस रिलीज पण ट्रायने शेअर केली आहे. या प्रेस रिलीजनुसार, अशा बोगस कॉलपासून मोबाईलधारकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सिम कार्ड च्या ज्याचे नावे आहे, त्या लोकांना काही कारणांनी धमकावण्यात येते. त्यांना सेवा बंद करण्याची धमकी देण्यात येते.
कुठे करणार तक्रार
याविषयीचा कॉल आल्यास अगोदर तुमच्या टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याविषयीची तक्रार द्या. त्यांच्याकडे त्या क्रमांकाची ओळख पटवा. तुम्ही थेट नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार करु शकता. सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करु शकता. गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वरचेवर वाढले आहेत.
फसविण्यासाठी अनेक प्रकार
काही सायबर गुन्हेगार लोकांना गंडविण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. अर्धवेळ कामाचे आमिष, वर्क फॉर्म होमचे आमिष, पार्सल, कुरिअर सेवा, डिलिव्हरी बॉयचा जॉब अशा युक्त्या वापरुन काही जण सर्वसामान्यांना गंडा घालत असल्याचे तक्रारीवरुन समोर आले आहे. तर काही विविध विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत, धमकावत गंडा घालत आहेत.